आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १७ : ज्या शिक्षणसंस्था दर्जा कायम राखतील, त्यांनाच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रूसा)माध्यमातून निधी प्रदान करण्यात येईल शिवाय ज्या सुविधेसाठी निधी वितरित करण्यात आला आहे, त्यासाठीच त्याचे उपयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी येथे केले.नवी दिल्ली येथील मंत्रालयाच्या मुख्यालयातून मंत्री जावडेकर यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता शिवाजी विद्यापीठासह देशभरातील १७ विद्यापीठांमधील ‘रूसा’अंतर्गत उभारलेल्या विविध सुविधांचे डिजीटल उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात उद्घाटित होण्याचा पहिला सन्मान शिवाजी विद्यापीठाच्या ‘नॅचरल प्रॉडक्टस अॅन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन’(नैसर्गिक पदार्थ आणि पर्यायी औषधी केंद्र)ला मिळाला. मंत्री जावडेकर म्हणाले, उच्चशिक्षणाचा दर्जा वाढावा, यासाठी केंद्र सरकारने संशोधकीय पायाभूत सुविधांसाठी सुमारे २८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील सुमारे १३०० कोटी रुपयांचे वितरण ‘रूसा’ अंतर्गत करण्यात येत आहे. रूसा ही केवळ मॉनिटरिंग एजन्सी नाही, तर उच्चशिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे कार्यही तिच्याकडून अपेक्षित आहे. उच्चशिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी संशोधकीय पायाभूत सुविधांच्या निर्मितीस रूसा प्राधान्य देत आहे. त्याची सुरवात आज देशातील १७ महत्त्वाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून होत आहे.दरम्यान, या कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, खासदार धनंजय महाडिक, ‘रूसा’च्या प्रधान सचिव व राज्य प्रकल्प संचालक मीता राजीवलोचन, सहसंचालक शरद पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जी. एन. शिंदे, प्रधान इन्व्हेस्टिगेटर डॉ. शैलेश वढार, विद्यापीठाच्या रूसा केंद्राच्या समन्वयक डॉ. अकल्पिता अरविंदेकर, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रधान इन्व्हेस्टिगेटर डॉ. प्रवीण यन्नावार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तासाभरात १७ शिक्षण संस्थांमधील केंद्रांचे उद्घाटनशिवाजी विद्यापीठातील नॅचरल प्रॉडक्टस् अॅन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीनविषयक रूसा केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तेथे उत्तम सुविधा उपलब्ध असल्याचे मंत्री जावडेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते ‘रुसा’चे पोर्टल आणि मोबाईल अप्लीकेशनचेही उद्घाटन झाले. रुसाच्या राष्ट्रीय मिशन संचालक इशिता रॉय, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव केवलकुमार शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यापीठात वनौषधींवर प्रक्रियेची सुविधारूसा सेंटर फॉर नॅचरल प्रॉडक्ट्स एन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन उभारण्यासाठी ‘रूसा’कडून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यातून अत्याधुनिक संशोधन सामग्रीने सुसज्ज असे केंद्र शिवाजी विद्यापीठात साकारले आहे. केंद्रात औषधे, न्यूट्रास्युटिकल आणि कॉस्मेटिक उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या वनौषधींवर प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
दर्जा कायम राखणाऱ्या संस्थांनाच मिळणार निधी : प्रकाश जावडेकर
By admin | Published: April 17, 2017 7:03 PM