राज्यभरात सगळीकडे कोविडची साथ पुन्हा एकदा सुरू झाली असून, रोज रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तुलनेने कमी रुग्ण आढळून येत असले तरी पूर्वतयारी करून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. महानगरपालिका यंत्रणाही कार्यरत झाली आहे. रुग्णालये, कोविड केअर सेंटर तसेच स्मशानभूमीतही तयारी करण्यात आली आहे. सध्या कोल्हापुरात फारसी चिंताजनक परिस्थिती नसली तरी खबरदारी म्हणून पूर्वतयारी करण्यात येत आहे.
शहर परिसरात कोविडमुळे काेणी व्यक्ती मृत झाली तर मृतदेह घरी दिला जात नाही. रुग्णालयातूनच थेट स्मशानभूमीत नेला जातो. त्या ठिकाणी महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. नवीन वर्षात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत कोविडमुळे मृत झालेल्या ५५ व्यक्तींवर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीतील कर्मचारी पीपीई किट घालून हे सोपस्कार पार पाडत आहेत.
मागच्या वर्षी रोज पंधरा ते वीस व्यक्तींचा कोविडमुळे मृत्यू होत होता. रुग्णालयातून मृतदेह आणणे आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्याचा मोठा भार आरोग्य कर्मचाऱ्यांवर पडला होता. कोविड व नॉन-कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याकरिता प्रतीक्षा करावी लागत होती. गेल्या तीन महिन्यांपासून स्मशानभूमीत गॅसदाहिनीसह सात बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. ५५ पैकी ४५ मृतदेहांवर गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.