या दोन्ही वृद्धांच्या घरातील अन्य सर्व सदस्य हे कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे वृद्धांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याची माहिती बैतुलमाल कमिटीचे अध्यक्ष जाफरबाबा सय्यद यांना मिळाली. त्यावर कमिटीचे सदस्य, कार्यकर्त्यांनी या दोन्ही वृद्धांचे पार्थिव हे कोरोनाच्या नियमांचे पालन करीत पंचगंगा स्मशानभूमीत आणले. त्यांच्यावर हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. महाडिक माळ येथे बुधवारी निधन झालेल्या वृद्धा यांच्या अंत्यसंस्काराची तयारी माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, सैफुल्ला मलबारी, वासिम चाबूकस्वार, राजू नदाफ, मुआज मणेर, जाबीर मलबारी, आकीत भालदार, समीर बागवान, युनूस शेख, सागर तहसीलदार यांनी, तर शिवाजीपेठेमध्ये शनिवारी निधन झालेले वृद्ध यांच्या अंत्यसंस्काराची तयारी तौफिक मुल्लाणी आणि राजू नदाफ यांच्यासह माजी नगरसेविका जयश्री चव्हाण, मौलाना आकीब मालदार, नईम पठाण, आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी केली.
चौकट
मदतीसाठी तरुणांनी पुढे यावे
कोरोनाचे संकटात माणुसकीच्या नात्याने विविध स्वरूपातील मदत, अंत्यसंस्कार हे बैतुलमाल कमिटीकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे दीड हजार पार्थिवांवर कमिटीकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यात हिंदू, मुस्लिम, आदी समाजांतील नागरिकांचा समावेश असल्याचे बैतुलमाल कमिटीचे अध्यक्ष जाफरबाबा सय्यद यांनी सांगितले. कोरोनाचा सध्याचा काळ कठीण आहे. त्यामध्ये गरजूंच्या मदतीसाठी समाजातील तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.