कोल्हापूर : लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नऊ नियमित मृतदेहांवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कोरोनाने मृत्यू पावलेल्या पाचजणांचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीच केले. माणूस हादरवून टाकणारी स्मशानशांतता तिथे अनुभवण्यास मिळाली.
लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी रात्री बारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पंचगंगा स्मशानभूमीत पाच कोरोनाबाधित मृतदेहांवर गॅसदाहिनीत विना नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी आपलेच नातेवाईक असल्याचे समजून अंत्यसंस्कार केले. नऊ नियमित मृत्यू झालेल्या मृतदेहांवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. इतरवेळी स्मशानभूमीत एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी, सगेसोयरे मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मात्र, लाॅकडाऊन आणि कोरोनाच्या नियमावलीचे पालन करीत शनिवारी मात्र अगदीच नगण्य मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाल्याचे चित्र होते. त्यामुळे स्मशानभूमी असली तरी या स्मशानभूमीत वर्दळ असते. मात्र, शनिवारी दिवसभर अगदीच शब्दाप्रमाणे स्मशानशांतता होती.
चौकट
३० लाख शेणीची व्यवस्था..
कोविडच्या पहिल्या लाटेत अनेकांचे कोरोनामुळे मृत्यू झाले. अनेकांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नव्हती. ही पार्श्वभूमी लक्षा घेता महापालिका प्रशासनाने अशी वेळ पुन्हा येऊ नये याकरिता ३० लाख शेणी, २०० टन लाकूड अशी सज्जता ठेवली आहे. याशिवाय २०० टन आगाऊ लाकूड मागवले आहे. तीन प्रहरात प्रत्येकी आठ कर्मचारी असे २४ जण दिवसरात्र कार्यरत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला पीपीई किट आणि कोरोनासंबंधी सुरक्षा साहित्य पुरविण्यात आले आहे.
मोफत दहनाची परंपरा आजही
केवळ एक कापराची डबी, तीनशे शेणी आणि एक मण अर्थात ४० किलो लाकडांमध्ये एका व्यक्तीचे दहन होते. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मूळच्या कोल्हापूरकरांची आणि येथील प्रत्येक नागरिकाची जगाचा निरोप घेतल्यानंतर कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीतच आपल्यासह आपल्या नातेवाइकांवरही अंत्यसंस्कार व्हावेत, अशी मनोमन इच्छा असते. हीच परंपरा आजही मानवतेच्या दृष्टीने मोफत दहनाद्वारे कोल्हापूर महानगरपालिकेने जपली आहे.
फोटो : १००४२०२१-कोल-स्मशानभूमी
ओळ : कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी गर्दी असते. मात्र, शनिवारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमुळे नियमित मृत्यू पावलेल्यांच्या मृतदेहांवर निर्मनुष्य परिस्थितीत अंत्यसंस्कार झाले.
(छाया : आदित्य वेल्हाळ)