कोल्हापूर : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या शहरात एलईडी बल्ब बसविण्याच्या कामाचे चार दिवसांत फेरनियोजन करावे, अशा सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विद्युत विभागास दिल्या आहेत. शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच विद्युत विभागाच्या सहायक अभियंता सारिका शेळके यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.गुरुवारी (दि. ११) झालेल्या विशेष सभेत सर्वच नगरसेवकांनी एलईडी बल्ब बसविणाऱ्या कंपनीविरोधात जोरदार तक्रारी केल्या होत्या. तसेच त्यांच्या कामावर सडकून टीका केली होती. एनर्जी एफिसियन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीची मनमानी खपवून घ्यायला ते काय महापालिकेचे जावई आहेत का? असा सवालही सभेत उपस्थित करण्यात आला होता. ठेकेदाराच्या मनमानीमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.सभागृहात नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या भावनांची आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली असून, विद्युत विभागाच्या सर्व कर्मचाºयांशी तसेच उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याबरोबर चर्चा केली. कंपनी सध्या कशा प्रकारे काम करीत आहे, त्यांच्याकडे मनुष्यबळ किती आहे, आणखी किती मनुष्यबळ लागेल याची माहिती घ्या.
कोणत्या ठिकाणी किती क्षमतेचे बल्ब लावले पाहिजेत, कोणत्या भागात बसविलेले बल्ब बंद पडले आहेत, याची माहिती करून घ्या. ही सगळी माहिती हाती आल्यानंतर कालबद्ध कार्यक्रम तयार करा. प्रत्येक दिवशी किती प्रभागात किती बल्ब जोडले जाणार हे निश्चित करा. एकूण सर्वच कामांचे फेरनियोजन करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत.शहरात एलईडी बल्ब बसविण्याचा उपक्रम भारत सरकारचा असून, त्याचे काम एनर्जी एफिसिएन्सी लि. या कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनीही सरकारनेच नियुक्त केली आहे. फक्त महापालिका सभागृहाने तिला मान्यता द्यायची होती. जेव्हा असा प्रस्ताव महापालिका सभागृहात आला तेव्हा सत्तारूढ कॉँग्रेस, राष्ट्र्वादी कॉँग्रेसच्या सदस्यांनी त्यास सुरुवातीस विरोध केला होता.
दोन सभांमध्ये त्यावर निर्णय झाला नाही. तो पुढे ढकलण्यात आला. या उपक्रमांतर्गत बल्ब जोडण्याच्या कामावर नियंत्रण कोण ठेवणार, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली होती; परंतु तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी भारत सरकारचा हा उपक्रम असल्यामुळे तो मंजूर करून द्या, अशी विनंती केली होती. त्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात आला.