गांधीनगरच्या सिंधू मार्केट, भाजीमंडईत व शिरू चौक या ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची भीती आहे. नागरिकांकडून नियमांची ऐशीतैसी होत असताना ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन हतबल झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्ण वाढत असून गांधीनगर मार्केट हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु गांधीनगर मार्केटमध्ये नागरिकांना सूट दिली आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. किरकोळ कारणासाठी रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ग्रामपंचायतही विना मास्क फिरणाऱ्यांवर जुजबी कारवाई करताना दिसत आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली औषधी खरेदी, दवाखाना, किराणा मालाचा बाजार, दूध, अशी कारणे सांगून अनेक जण विनाकारण रस्त्यावरून मुक्तसंचार करत आहेत. भाजीमंडईची जागा अपुरी असल्याने त्या ठिकाणी ग्राहक व भाजीविक्रेते यांची गर्दी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला आहे.
चौकट :
गांधीनगर ग्रामपंचायत प्रशासनाने भाजी मंडईतील वाढती गर्दी पाहून छत्रपती शाहू महाराज हायस्कूलचे पटांगणावर भाजी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध केली आहे. त्याला काही विक्रेत्यांनी विरोध केला. त्यामुळे गांधीनगरचे सपोनि दीपक भांडवलकर यांनी सरपंच रितू लालवानी, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण व काही भाजीविक्रेते यांची बैठक करून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच भाजी विक्रेत्यांची अँटीजेन टेस्ट करून मगच त्यांना भाजी विकण्यास परवानगी द्यावी. सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर वापरणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे दीपक भांडवलकर यांनी सांगितले.
फोटो : २० गांधीनगर मार्केट
ओळ-गांधीनगर भाजी मंडईत असा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. (छाया बाबासाहेब नेर्ले)