कोरोनामुळे शाळा, कॉलेज ऑनलाईन सुरू आहेत. मात्र, ऑनलाईन क्लास अटेंट करताना ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची परवड होत आहे त्यामुळे पालक चिंतेत पडले आहेत. गगनबावडा तालुक्यातील शेणवडे, गुरववाडी, खोकुर्ले, पडवळवाडी, पळसंबे, मार्गेवाडी यासारख्या अनेक दुर्गम गावांतील मुले ऑनलाईन अभ्यासासाठी गावापासून लांब डोंगरमाथ्यावर चालत जात नेटवर्क शोधून ऑनलाईन क्लास अटेंट करत आहेत. या गावांत कुठेही नेटवर्क नाही. त्यामुळे गावातील मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी पायपीट करून डोंगरमाथ्यावर जावे लागते. तेव्हा जंगली श्वपादापासून जीव मुठीत धरून अभ्यास करावा लागतो. या भागात सरपटणारे साप, हिंसक गवरेडे, बिबटया यासारखे प्राणी असतात. त्यामुळे त्यांच्यापासून धोका असण्याची भीती पालकांना असते. मात्र, शिक्षणासाठी त्यांना त्या ठिकाणी पाठवावे लागते. शासनाने गावातच इंटरनेटचा सक्षम पर्याय उपलब्ध करून दिल्यास किंवा एखाद्या मोबाईल कंपनीस शिफारस केल्यास या मुलांची होणारी परवड थांबणार आहे. मोबाईल कंपन्या आपला फायदा पाहून लोकसंख्या व ग्राहकांची संख्या पाहून आपला टॉवर उभारतात. शहरी भागात अनेक टॉवर दिसून येतात, पण ग्रामीण भागात फारच दुर्लक्ष केले जाते. याकडे शासनाने लक्ष देऊन कंपन्यांना ग्रामीण भागात टॉवर बसविण्यास सक्ती करणे गरजेचे आहे, तरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्यास मदत होईल. डोंगरमाथ्यावर मुले ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी जातात. मात्र, मुले डोंगरमाथ्यावर गेल्यावर पालकांना चिंता लागते. कारण या डोंगरमाथ्यावर गवे, साप इतर श्वापदे असतात. त्यामुळे आपल्या मुलांना काही इजा होऊ नये यासाठी पालकांना चिंता लागलेली असते. त्यामुळे मुलांना शिक्षण महत्त्वाचे आहे, पण त्यापेक्षाही त्यांच्या जिवाची पर्वा पालकांना आहे. त्यामुळे शासनाने गावातच नेटवर्क उपलब्ध करून मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मुलांसह पालकांची मागणी आहे.
गगनबावडा तालुक्यात ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:29 AM