बाबासाहेब नेर्ले : गांधीनगर : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी एकीकडे प्रशासन जिवाचे रान करत असताना दुसरीकडे नागरिकांना मात्र याचे काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र सध्या गांधीनगरात पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व नियम मोडीत काढत गांधीनगर बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला आहे. बाजारपेठेत नागरिक विनामास्क वावरत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनानेच यासाठी कडक पावले उचलत त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या गांधीनगर बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी ग्राहक कर्नाटकासह कोकण, मिरज, सांगली, तसेच इतर अन्य जिल्ह्यांतून बाजारपेठेत येत असतो. त्यामुळे या बाजारपेठेत नेहमीच वर्दळ असते, पण बहुतांशी लोक विनामास्क फिरताना दिसत आहेत. तसेच व्यापाऱ्यांच्या काही दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे चित्र आहे. अनेक व्यापारीच स्वत: मास्क लावत नााहीत. त्यामुळे ते ग्राहकांना मास्क लावणे बंधनकारक कसे करू शकतील हा प्रश्नच आहे.
कोट : गांधीनगर बाजारपेठेत नागरिक बेफिकिरीने फिरत आहेत. कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे लोकांनी नियमांचे पालन काटेकोर करणे गरजेचे आहे. अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे. मास्क वापरणे गरजेचे असून, ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही गोष्ट मनात आणून वागणे गरजेचे आहे.
राजू कांबळे (दलित महासंघ शहराध्यक्ष)
कोट : कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानात विनामास्क येणाऱ्या ग्राहकांना मास्कची सक्ती करणे, सॅनिटायझरची सोय करणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे. नियमांचे पालन केल्यास कोरोना हद्दपार होण्यास मदत होईल.
रमेश वाच्छानी, व्यापारी, गांधीनगर
कोट : कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक व्यापारी महामारीला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे अशा बेफिकीर आणि नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांसह ग्राहकांवर कारवाई होण्याची गरज आहे.
अंकुश वराळे (शहराध्यक्ष आरपीआय, गांधीनगर)
फोटो: ०७ गांधीनगर बाजारपेठ
ओळ:- गांधीनगर बाजारपेठेत नागरिक दुकानात विनामास्क दिसत आहेत. (छाया :अनिल निगडे)