बुबनाळ : गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे शुक्रवारी पुन्हा दोन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजअखेर चार पॉझिटिव्ह रुग्ण झाले असूनही गणेशवाडीत नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शुक्रवारचा आठवडी बाजारही सामाजिक अंतर न पाळता भरला, तर गावातील काही व्यापाऱ्यांनी निम्मे शटर उघडून आपला व्यवसाय सुरू केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना तिलांजली दिली जात असताना कोरोना प्रतिबंधात्मक ग्राम समितीचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात पंधराहून अधिकजण आले असून त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. असे असले तरी गावात सर्वकाही अलबेल आहे. व्यापाऱ्यांनी निम्मे शटर उघडून आपले व्यवसाय सुरू ठेवले आहेत. दरम्यान, शुक्रवारी आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने मांडली होती. याठिकाणी सामाजिक अंतर न ठेवता नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले. याकडे ग्राम समितीचे दुर्लक्ष झाले असून, कोणीही गांभीर्याने घेतले नाही, असे चित्र आहे.
फोटो - २४०४२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील बाजारात झालेली गर्दी. (छाया : रमेश सुतार, बुबनाळ)