गावामध्ये कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामपंचायत आयसोलेशन कोविड सेंटर व कै. पुष्पादेवी हरिभाऊ मसूरकर फाऊंडेशनचे कोविड सेंटर उभे करण्यात आले आहे. या दोन्ही सेंटरच्या माध्यमातून अनेक रुग्ण बरे होऊन रुग्णांचा आकडा घटत आहे. मात्र वीकेंड लॉकडाऊन होताच नवीन बसस्थानक ते कन्या शाळेपर्यंत आज बाजार भरविण्यात आला. या बाजारामध्ये ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्सिंगचा फजा उडवत मोठी गर्दी केली होती. माळवे घेण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली होती. मुळातच गावामध्ये बाजारातूनच कोरोना फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. अशातच आज भरलेला हा बाजार आणि त्यामधील गर्दी यामुळे पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बाजार आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
पट्टणकोडोलीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:16 AM