दत्ता पाटील
म्हाकवे : कागल तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीचा उद्या, मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या निवडणुका अत्यंत अटीतटीने होत असल्याने एक-एक मत महत्त्वाचे असते. त्यामुळे काहीजणांनी श्रावणबाळ, दिव्यांग, संजय गांधी निराधार योजना, बांधकाम कामगार योजना यासह व्यक्तिगत योजना मिळवून देण्याचे आमिष दाखवत अर्जाचे गठ्ठेच घेऊन अनेक कुटुंबांशी थेट संपर्क साधत आहेत. कागल हे राजकारणाचे विद्यापीठ मानले जाते. येथे प्रत्येक निवडणूक ही इर्षेनेच लढविली जाते. तसेच, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्ष किंवा वरिष्ठ गटानुसार युत्या न होता, स्थानिक पातळीवरच निवडणुका संगनमताने होतात. नातेवाईक, भाऊबंद, मित्रपरिवार यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असते. त्यानुसार उमेदवार निवडीसाठी चाचपण्याही सुरू आहेत. येनकेन मार्गाने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करायचे, त्यांच्या समोर पायघड्या घातल्या जात आहेत. तसेच, विविध योजनांचा लाभ मिळवून देतो हा अर्ज भरून द्या असे सांगितले जात आहे. काहीजण लोकांच्या अडाणीपणाचा फायदा उठविण्याच्या तयारीत असल्याचे दिसत असल्याने अशा आमिषांना बळी पडू नये, असे मेसेजही सोशल मीडियावर प्रसारित करून काही जाणकार जागृती करत आहेत.
... तर महिनाभरात पितळ उघडे?
कागलमध्ये सर्वाधिक निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. राजकीय वर्चस्वातून कार्यकर्त्यांनी अनेकांना लाभ मिळवून दिला आहे. तरीही, शासनाकडून मिळणारा फुकटचा लाभ का सोडायचा?म्हणून अनेकजण हे अर्ज भरताना दिसत आहेत. परंतु, केवळ महिन्याभरातच निवडणूक संपताच यांचे पितळ उघडे पडणार आहे.