कोल्हापूर : महोत्सवाचा उत्सव होऊ नये, त्यातून तरुण महिला व शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोल्हापुरात भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू मराठा महोत्सवातून गुरुवारी प्रबोधन झाले. शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, मुलींच्या लेझीम अन् झांजपथकांचा दणदणाट, प्रबोधनपर व्याख्याने, ग्रंथ, व्यवसायवृद्धीपर विविध स्टॉल्स अशा विविध उपक्रमांनी चार दिवसीय महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. राज्यातील हा पहिलाच प्रबोधन महोत्सव असल्याने दिवसभर या ठिकाणी गर्दी झाली होती.
दसरा चौकातील या महोत्सवाचे उद्घाटन वीरमाता संयोगीता शिंदे, लक्ष्मी जाधव, मनीषा मदनराव सूर्यवंशी, छाया भोसले, आनंदी उलपे व वीरपत्नी कांचनदेवी चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची होती. महोत्सवासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी रायगडच्या नगारखान्याच्या प्रतिकृतीचे प्रवेशद्वार तयार करण्यात आले असून, त्याला स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज असे नाव ठेवण्यात आले आहे. प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा २० फुटी अश्वारूढ पुतळा ठेवण्यात आला आहे. त्याचे पूजन उद्योगपती चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योगपती संग्राम पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, डॉ. भरत कोटकर, अॅड. धनंजय पठाडे, वसंतराव देशमुख, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी सानेगुरुजी वसाहतीतील वसंतराव देशमुख हायस्कूलच्या भगवे फेटे बांधलेल्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवरायांच्या जयघोषात लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच कदमवाडीतील संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झांजपथकांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर शाहू स्मारक भवन येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन होऊन निमंत्रितांच्या मेळाव्याला सुरुवात झाली. प्रमुख उपस्थिती माजी महापौर शोभा बोंद्रे, नगरसेवक अशोक जाधव, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. विवेक घाटगे, सतीश कडूकर, सुभाष जाधव, आदींची होती. यावेळी महाराष्टÑ हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मराठा महासंघाचे करवीर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. शाहीर मिलिंद सावंत यांच्या शाहू गीताने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
मेळाव्यात वसंतराव मुळीक म्हणाले, महोत्सव हा उत्सव न होता, तो दिशादर्शक व्हावा या उद्देशाने त्याचे नियोजन करण्यात आले आहे. युवक, महिला, शेतकरी, विद्यार्थी यांंचे प्रबोधन होण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. मेळाव्यात मराठा भवन उभारणीसाठी ताकदीने प्रयत्न करण्यासह प्रसंगी जागा खरेदी करण्याचा निर्धार मान्यवरांनी केला.विविध स्टॉल्समधून मार्गदर्शनमहोत्सवात व्यवसायवृृद्धीसाठीचे ४१, खाद्यपदार्थांचे १८, प्रबोधनात्मक व वैचारिक ग्रंथसंपदा असलेल्या पुस्तकांचे ६ व गृहोपयोगी वस्तूंचे चार स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी माहिती घेण्यासाठी व खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.महोत्सवात आजबैठक : मराठा महासंघातर्फे राज्यस्तरीय बैठकवेळ : सकाळी ११ वाजतास्थळ : मिनी सभागृह, शाहू स्मारकमार्गदर्शन शिबिर : कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ लाभार्थी कर्जासंदर्भात मार्गदर्शन शिबिरवेळ : दुपारी १ वाजतास्थळ : शाहू स्मारक सभागृहमेळावा : कोल्हापूर जिल्हा सकल मराठा समाजाचा मेळावावेळ : दुपारी ३ वाजतास्थळ : शाहू स्मारक सभागृहसांस्कृतिक कार्यक्रम : मर्दानी खेळ, शाहिरी, विद्यार्थी कलासादरीकरण असे कार्यक्रमवेळ : दुपारी ४ वाजतास्थळ : दसरा चौक व्यासपीठ