प्रकाश पाटील -- कोपार्डेकोल्हापूर जिल्ह्यातील चार होमिओपॅथी महाविद्यालये शैक्षणिक वर्षाची पहिली टर्म संपली तरी अजून सुरू झालेली नाहीत. यामुळे अडीचशे विद्यार्थी संख्या असणाऱ्या जिल्ह्यातील होमिओपॅथी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. काही मुलांनी संस्था कोट्यातून प्रवेश मिळावा म्हणून पाच लाखांपासून आठ लाखांपर्यंत डोनेशन दिले असून, प्रशासन कॉलेज कधी चालू होईल, हे सांगत नसल्याने पालकही संभ्रमावस्थेत आहेत.१२वीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा वैद्यकीय व इंजिनिअरिंगकडे मोठा असतो. याच्या प्रवेशासाठी शासनाकडून सीईटी व यावर्षीपासून नीट परीक्षा घेतली जात आहे. यावर्षी एमबीबीएसच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने सीईटीऐवजी नीट परीक्षा पद्धत अमलात आणली. मात्र, बीएएमएस व बीएचएमएससाठी सीईटी हीच प्रवेश पद्धती अवलंबून प्रवेश परीक्षा घेतली. यातून मेरीटप्रमाणे पहिल्या ३५ हजार विद्यार्थ्यांना आॅनलाईन फॉर्म भरून कॉलेजची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ही प्रक्रिया पूर्ण होऊन या कोर्ससाठी जून ते जून अशा शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होणे आवश्यक होते. मात्र, पाच महिन्यांपासून कॉलेज प्रशासनाकडे विचारणा सुरू असून, चौकशीअंती आज सुरू होणार आहे, उद्या सुरू होतील, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. जिल्ह्यातील चार होमिओपॅथी महाविद्यालयांमध्ये वेणुताई चव्हाण होमिओपॅथी कॉलेज दसरा चौक, जगद्गुरू शंकराचार्य होमिओपॅथी कॉलेज, कोल्हापूर, जे. जे. मगदूम होमिओपॅथी, जयसिंगपूर, ए. बी. गडकरी होमिओपॅथी, गडहिंग्लज यांचा समावेश आहे. संस्था कोट्यातून प्रवेश घेणाऱ्यांची धाकधूक काही पालकांनी आमदार, खासदार व राजकीय दबाव टाकून प्रवेश घेण्यासाठी पाच ते आठ लाख रुपये भरले आहेत; पण पाच महिने झाले तरी होमिओपॅथी महाविद्यालये सुरू नाहीत. हे पैसे परत मिळणार काय आणि मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यात २०० होमिओपॅथी कॉलेजेस आहेत. यातील ४० कॉलेजना अजूनही अटी व शर्ती पूर्ण न केल्याने केंद्राकडून परवानगी दिलेली नाही. आमच्या कॉलेजला एक महिन्यापूर्वी परवानगी मिळाली आहे; पण काही तांत्रिक कारणाने सुरू केलेले नाही. १ डिसेंबरला सुरू करणार आहे.- राजकुमार पाटील, प्राचार्य, जगद्गुरू शंकराचार्य होमिओपॅथी कॉलेज्
होमिओपॅथी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
By admin | Published: November 15, 2016 1:21 AM