राम मगदूम - गडहिंग्लज ‘चंदगड’च्या आमदारकीसह गडहिंग्लज व आजरा पंचायत समित्यांवर निर्विवाद सत्ता आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची भक्कम फळी असतानाही गोकुळ व केडीसीसीच्या निवडणुकीत नेत्यांच्या ‘सोयी’च्या आणि कुरघोडीच्या व शहकाटशहच्या राजकारणाने गडहिंग्लज विभागात राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष बॅकफूटवर गेला आहे. ज्येष्ठ नेते स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यांत राष्ट्रवादीची भक्कम बांधणी केली. गडहिंग्लज व आजऱ्याची पंचायत समितीदेखील राष्ट्रवादीच्या ताब्यातच आहे. जिल्ह्याच्या तालुक्यांच्या तुलनेत येथे पक्ष प्रबळ असतानाही गोकुळ व केडीसीसीच्या निवडणुकीत या भागातील कार्यकर्त्यांवर अन्यायच झाला. केडीसीसीमध्ये गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन संचालक होते. संतोष पाटील-कडलगेकर यांच्या रूपाने यंदा पक्षाला एकच उमेदवारी मिळाली. संध्यादेवींना मदत केलेल्या प्रकाशराव चव्हाण यांना डावलले. बंडखोरी केलेल्या अप्पी पाटील यांना ‘सत्तारूढ’ मधून उमेदवारी दिली. ‘आजरा’त अशोक चराटी यांना डावलून विरोधक जयवंत शिंपींना उमेदवारी देण्यात आली. ‘चंदगड’मध्ये विरोधकांनाच ताकद !आ. संध्यादेवी कुपेकर यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले नरसिंगराव पाटील यांचे सुपुत्र राजेश आणि भरमूअण्णा पाटील यांचे सुपुत्र दीपक यांना चंदगड तालुक्यातून, तर भरमूअण्णांना पाठिंबा दिलेल्या सदानंद हत्तरकी यांना गडहिंग्लजमधून ‘गोकुळ’ची ‘सत्तारूढ’ची उमेदवारी दिली. मात्र, कागलमध्ये अमरीश घाटगे यांची उमेदवारी डावलण्याची ‘खेळी’ खेळलेल्या नेत्यांनी ‘चंदगड’मधील विरोधकांच्या उमेदवारीबद्दल ‘ब्र’देखील काढले नाही.
गडहिंग्लज विभागात राष्ट्रवादी ‘बॅकफूट’वर!
By admin | Published: April 27, 2015 12:40 AM