अरळगुंडी बस बेडीवपर्यंत सोडा
गडहिंग्लज : गडहिंग्लज-अरळगुंडी बस बेडीवपर्यंत सोडावी, अशी मागणी प्रवाशांनी गडहिंग्लज आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सावतवाडी-बेडीव व धनगरवाडा येथील सुमारे ७० विद्यार्थी शिक्षणासाठी भुदरगड तालुक्यातील अरळगुंडीला येतात. त्यांच्या सोयीसाठी दुपारी १२ ची बस बेडीवपर्यंत सोडावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
------------------------------
रवींद्र कांबळे यांची निवड
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे कोल्हापूर जिल्हा कामगार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. जिल्हाध्यक्ष कॉ. नामदेव गावडे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. ते महागाव येथील ग्रामपंचायतीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
* रवींद्र कांबळे : २१०३२०२१-गड-०७
------------------------------
स्वरा मांडवे हिचे यश
गडहिंग्लज : भडगाव येथील स्वरा सुखदेव मांडवे हिने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. ती लिटल मास्टर गुरूकुलम मुरगुड या शाळेत शिकते. तिला सत्यजीत मराठे, इंद्रजित मराठे, सुमन आणावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
------------------------------
‘ओंकार’मध्ये राष्ट्रीय वेबिनार
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वेबिनार पार पडले. ‘कोविड आणि सामाजिक शास्त्रातील बदलते आयाम’ हा वेबिनारचा विषय होता. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण होते. वेबिनारमध्ये डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. देवीदास वायदंडे, प्रा. प्रतिभा अघारडे, डॉ. प्रभाकर कोळेकर, पांडुरंग पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. काशीनाथ तनंगे यांनी प्रास्ताविक केले. गंगासागर चोले यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले.