सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
गडहिंग्लज येथे आज रक्तदान शिबिर
गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी (दि. १२) रोजी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत येथील यशवंत बाजारमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक आणि संकेश्वरच्या हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे राज्यभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी अधिकाधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मंत्री पाटील यांना वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आरबोळे यांनी केले आहे.
बातमी -२ कानोलीच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू
गडहिंग्लज : कानोली (ता. आजरा) येथील तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा तरुण खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून तो आजारी होता. शुक्रवारी (दि. ७) अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सीपीआरमध्ये हलविण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
------
संकेश्वर आगाराचे ४८ लाखांचे नुकसान
संकेश्वर : दिनांक ७ मार्चपासून कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे संकेश्वर आगाराचे ४ दिवसात ४८ लाखांचे नुकसान झाले आहे. संकेश्वर आगाराकडे ३४६ चालक, वाहक आणि ६३ इतर कर्मचारी आहेत. या सर्वांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे आगाराकडील ११२ बसगाड्यांची चाके थांबली असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. आगारातील ६ प्रशिक्षणार्थींना संपात सहभाग घेता येत नसल्यामुळे त्यांना तत्काळ सेवेत रुजू होण्याचे आदेश नोटीसव्दारे देण्यात आले आहेत.
----