गडहिंग्लजमध्ये ६ लाखांचा देशी मद्यसाठा जप्त
राज्य उत्पादनची कारवाई : औरनाळच्या एकावर गुन्हा
गडहिंग्लज : कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात अवैधरीत्या साठा करून ठेवलेला ६ लाख ३९ हजार रुपये किमतीचा देशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून जप्त केला. शहरातील काळभैरी रोडवरील एका चाळीत शुक्रवारी (२३) रात्री उशिरा ही कारवाई केली. याप्रकरणी अंकुश सुरेश भोसले (रा.औरनाळ, ता.गडहिंग्लज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, शहरातील काळभैरी रोडवरील एका चाळीत देशी दारूचा अवैध साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार हा छापा टाकण्यात आला. छाप्यात ६ लाख ३९ हजार रुपये किमतीच्या मद्याच्या १२ हजार ६०० बाटल्या जप्त करण्यात आल्या.
उपायुक्त वाय.एम. पोवार, अधीक्षक संध्याराणी देशमुख, उपाधीक्षक बी.आर. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम.एस. गरूड, दुय्यम निरीक्षक जी.एन.गुरव, ए.बी.वाघमारे, एस.आर.ठोंबरे यांनी ही कारवाई केली आहे.
----------
बातमी -२
कोरोना नियमांचे उल्लंघन,
वधू-वरासह ७ जणांवर गुन्हा
संकेश्वर : कोरोना नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळ्याला ५० ऐवजी ३०० लोक जमल्यामुळे वधू- वरासह मंगल कार्यालय मालक फकिरिया सौदागर यांच्यासह ७ जणांवर संकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात मिनी लॉकडाऊन असतानाही येथील निडसोशी रोडवरील मिलन मंगल कार्यालयात गायकवाड व दवडते परिवारातर्फे विवाहसोहळा पार पडला.
दरम्यान, या लग्नाला ५० पेक्षा अधिक लोकांची गर्दी झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी घटनास्थळी जाऊन संबंधितांवर कारवाई केली.
मुख्याधिकारी अभिषेक नाईक यांच्या फिर्यादीवरून संकेश्वर पोलिसांत गुन्हा नोंद झाला.
----
बातमी-३ बेळगुंदीत दक्षता समितीची बैठक
गडहिंग्लज : बेळगुंदी (ता.गडहिंग्लज) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ग्राम दक्षता समितीची बैठक पार पडली. समितीचे अध्यक्ष सरपंच तानाजी रानगे अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी कोरोनासंदर्भातील शासनाच्या सर्व नियमावलींचे काटेकोर पालन करण्याबाबत चर्चा झाली.
सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत गावाच्या सीमा बंद ठेवल्या जातील. विनामास्क फिरणाऱ्यांना शंभर रुपये दंड तसेच विनापरवाना जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांकडून २ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस उपसरपंच दीपिका पाडले, मिलिंद मगदूम आदींसह ग्रा.पं.सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
-------
बातमी-४
ओंकारच्या रांगोळी स्पर्धेत चौगुले प्रथम
गडहिंग्लज : येथील ओंकार शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षक-पालक संघ व गृहशास्त्र विभागातर्फे ऑनलाइन रांगोळी स्पर्धेत सुनीता मारुती चौगुले हिने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेत मेघा महादेव राणे यांनी द्वितीय व शशिकला सुरेश गवळी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. ही स्पर्धा माता पालकांसाठी आयोजित केली होती. पालकांनी घरी विविध पानाफुलांच्या रांगोळ्या काढून त्याची छायाचित्रे पाठवली होती.
स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ.सुरेश चव्हाण, डॉ.गंगासागर चोले, डॉ.ज्ञानराजा चिघळीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.