गडहिंग्लज : गडहिंग्लजचे डीवायएसपी गणेश इंगळे यांनी येथील शिवराज विद्या संकुलास सदिच्छा भेट दिली. संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते त्यांचा शाल व ग्रंथ देऊन सत्कार झाला. या वेळी सचिव प्रा. अनिल कुराडे, संचालक दिग्विजय कुराडे, विक्रम शिंदे उपस्थित होते. प्रा. अशोक मोरमारे यांनी आभार मानले.
२
गिजवणे येथील सुपरस्प्रेडर निगेटिव्ह
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोनाचे संशयित सुपरस्प्रेडर म्हणून गावातील सर्व व्यापारी व कामगार मिळून ८५ जणांची अॅंटिजेन रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात गावातील सर्व किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, दूधविक्रेते, फळविक्रेते, पिठाची गिरणीचालक, पेट्रोल पंप कर्मचारी, हॉटेल व्यवसायिक व स्वीट मार्टचालक यांचा समावेश होता. तपासणीत सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. वैदयकीय अधिकारी डॉ. गीता कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. या वेळी सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच नितीन पाटील, ग्रामसेवक डी. बी. कुंभार, तलाठी अजितसिंह किल्लेदार, पोलीस पाटील महादेव कुंभार आदी उपस्थित होते.
बातमी -३
मुख्याध्यापकांकडून भटक्या कुटुंबांना धान्यवाटप
गडहिंग्लज : चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा, हेरे, चंदगड, कोवाड परिसरात पोटासाठी आलेल्या ५० भटक्या कुटुंबांना मुख्याध्यापक बाबूराव वरपे यांनी स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. ते बेरडवाडा शाळेत कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कपडे, तांदूळ, साखर, रवा, बिस्किटे, साबण, सॅनिटायझर, हॅण्डवॉश आदी वस्तूंची मदत करून त्यांनी माणुसकी जपली.
बातमी -४
मृतांच्या वारसांना मदतीची मागणी
गडहिंग्लज : मुगळी (ता. गडहिंग्लज ) येथे पावसात पोल्ट्रीची भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या नांगनूर येथील मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.