गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे महापुरामुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या नागरिकांना हसन मुश्रीफ फौंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तू व धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिंदे, आदित्य पाटील, प्रशांत कुंभार, अमित देसाई, भूषण गायकवाड, शिल्पाताई पाटील, अन्नपूर्णा नाईक, अमित दळवी, ग्रामविकास अधिकारी डी. बी. कुंभार, आदी उपस्थित होते.
जरळीकरांची पिण्याच्या पाण्यासाठी धडपड
गडहिंग्लज : जरळी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलचा विद्युत संच हिरण्यकेशीला आलेल्या महापुरात बुडाला आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. सध्या पूर ओसरला असला तरी विद्युत पुरवठा करणारी विद्युतवाहिनी नदीपात्रावरून आलेली आहे.
दोन्ही बाजूंचे खांबही वाकले असून, या खांबाजवळ अद्यापही चारफूट पाणी आहे. त्यामुळे दुरुस्ती रखडली आहे. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी लक्ष्मी विहिरीचा आधार असून, खर्चासाठी नागरिक नदीचे पाणी वापरत आहेत.
येत्या दोन-तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सरपंच सागर पाटील व ग्रामसेवक मारुती नांगरे यांनी दिली.
दुंडगेत पूरग्रस्तांची चाचणी
गडहिंग्लज : दुंडगे येथे महापुरामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांच्या आरोग्यासह कोरोना तपासणीही करण्यात आली. याकामी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मल्लिकार्जुन अथणी, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कोरे, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
ओढ्याचे रुंदीकरण करा
गडहिंग्लज : गिजवणे ग्रामपंचायतीने गडहिंग्लज शहरालगत व गावच्या हद्दीत असणाऱ्या ओढ्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे. झाडे-झुडपे, अतिक्रमण यामुळे ओढ्याचे पात्र अरुंद होऊन अलीकडे ओढ्याचे पाणी गावामध्ये घुसून नागरिक व पशुधनाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झाडे-झुडपे, अतिक्रमण व गाळ काढून ओढा पात्र रुंद करावे.
शिष्टमंडळात नितीन पाटील, अमित दळवी, लक्ष्मण शिंदे, अमित देसाई, भूषण गायकवाड, आदींचा समावेश होता.
ऐनापुरात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू वाटप
गडहिंग्लज : ऐनापूर येथे महापुरामुळे स्थलांतरित केलेल्या नागरिकांना अंडी, बिस्किटे, अन्नधान्याची मदत करण्यात आली. सरपंच उषा मांगले यांच्या निवासस्थानी या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याकामी उपसरपंच निवृत्ती मांगले, अॅड. सुरेश कुराडे, सागर पाटणे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार, लहू दड्डीकर, सुनील स्वामी यांनी परिश्रम घेतले.
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेचा बेमुदत संपाचा इशारा
गडहिंग्लज : व्यावसायिक पदविका डॉक्टरांच्या आंदोलनाकडे पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेने १ ऑगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. त्यांच्या बेमुदत संपामुळे पशूंच्या आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती आहे.
पशुधन पर्यवेक्षक, कर्मचारी, विकास अधिकारी, पदोन्नतीच्या वेतन निश्चित सुधारणा यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवासभत्ता मंजूर करावा, केंद्राकडून १९८४ कायद्यात सुधारणा करावी, आदी मागण्यांसाठी संघटनेचे १५ जूनपासून असहकार आंदोलन सुरू आहे. या प्रश्नांबाबत पशुसंवर्धन आयुक्तांनी ऑनलाईन बैठक घेतली. मात्र, त्यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बेमुदत संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय पशुचिकित्सा व्यावसायिकांनी घेतला आहे.
महागावमध्ये ऑनलाईन कार्यशाळा
गडहिंग्लज : महागाव येथील राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘कोविड-१९ व पर्यटन व्यवसाय’ या विषयावर कार्यशाळा झाली. संस्थाध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. निवास जाधव, डॉ. रचना मुसाई, प्रा. किशोर पाटील, डॉ. सुरेश चव्हाण, आदी उपस्थित होते.