१) हसूरवाडीत लोकसहभागातून उभारले रुग्णालय
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील हसूरवाडी या छोट्याशा गावाने लोकसहभागातून रुग्णालय उभे केले आहे. कोरोनाच्या संकटात ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबवून गरीब व गरजू रुग्णांसाठी गावकऱ्यांनी रुग्णालय सुरू केले आहे, अशी माहिती सरपंच संजय कांबळे यांनी दिली.
रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे मासिक मानधन तत्त्वावर डॉ. सुप्रिया मुदाळकर यांची नियुक्ती केली आहे. रुग्णालयाकडून मोफत तपासणी व औषधे दिली जातात. मधुमेह, रक्तदाब, तापमान तपासणीसह अन्य आजारांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांना रुग्णालयाचा लाभ होत आहे.
औषधे व रुग्णालयासाठी लागणारी उपकरणे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उपलब्ध करून दिली आहेत. याकामी हलकर्णी येथील आरोग्य केंद्राने सहकार्य केले आहे.
--------------------------
२) पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्या
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील शालेय पोषण आहार कामगारांनी आपल्या विविध मागण्या निवेदनातून शिक्षणमंत्र्यांकडे केल्या आहेत. याबाबत गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, शालेय पोषण आहार कामगारांचे प्रलंबित प्रश्न शासनाने तातडीने सोडवावेत, केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेऊन कामगारांच्या रोजगारावर गदा आणली आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा, केंद्रीय किचन पद्धत बंद करण्यात यावी.
कामगारांना नियमित मानधन देऊन कोरोना काळात दहा हजार रुपयांचे अनुदान द्यावे. पोषण आहार कामगारांना स्वयंपाकीचा दर्जा देण्यात यावा.
निवेदनावर आनंदा माने, अशोक शिंदे, सरोजिनी बटकडली, बाळकृष्ण पाटील, शालन मोहिते, सविता पाटील, शीतल माने, लता खांडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.