राम मगदूम - गडहिंग्लज -महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी इलाख्यातील बेळगाव जिल्ह्यात चंदगड व आजरा या दोन महालांचा मिळून चंदगड विधानसभा मतदारसंघ होता. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आजरा व मलिग्रे या दोन जिल्हा परिषद मतदारसंघांसह चंदगड तालुका मिळून ‘चंदगड-आजरा विधानसभा मतदारसंघ’, तर गडहिंग्लज तालुक्यासह उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ मिळून गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघ झाला. त्यानंतर अलीकडील पुनर्रचनेत आजऱ्याबरोबरच गडहिंग्लज तालुक्याची शकले होऊन नवीन चंदगड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. चंदगड, गडहिंग्लज मतदारसंघाच्या बदलत्या रचनेबरोबरच राजकीय समीकरणेही बदलत गेली आणि प्रारंभी शे.का.प.च्या वर्चस्वाखाली असणाऱ्या या मतदारसंघावर एक-दोन अपवाद वगळता काँग्रेसने अधिराज्य केले. त्यानंतर येथील जनतेने ‘राष्ट्रवादी’ला देखील साथ दिली. १९५२ मध्ये स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत ‘शेकाप’चे तत्कालीन नेते अॅड. व्ही. एस. पाटील हे ‘चंदगड महाला’तून मुंबई इलाख्यावर निवडून गेले. दरम्यान, त्यांना म्हैसूर प्रांताच्या विधानसभेवर देखील प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीतही शे.का.प.च्या नरसिंग भुजंगराव पाटील यांना संधी मिळाली. ‘चंदगड’मध्ये सलग दोनवेळा ‘शेकाप’ला संधी मिळाली असतानाही शेजारील ‘गडहिंग्लज’मध्ये पहिल्यावेळी रत्नाप्पा कुंभार गटाचे कॉँग्रेस नेते म. दु. श्रेष्ठी आमदार झाल्यानंतर ‘शेकाप’च्या भाई नार्वेकरांनी आमदारकी पटकावली. १९६२ मध्ये व्ही. के. चव्हाण-पाटील यांनी चंदगड-आजऱ्यातून, तर आप्पासाहेब नलवडे यांनी ‘गडहिंग्लज’मधून विधानसभेत कॉँग्रेसचा झेंडा फडकावला. त्यानंतरच्या १९६७ च्या निवडणुकीतही व्ही. के. यांनी बाजी मारली; पण गडहिंग्लजमध्ये ‘शेकाप’च्या भाई कोलेकरांनी नलवडेंचा पाडाव केला. १९७२ मध्ये बी. एस. पाटील यांनी गडहिंग्लजची, तर वसंतराव देसाई यांनी चंदगड-आजऱ्याची आमदारकी कॉँग्रेसकडे खेचून आणली. वसंतरावांच्या रूपाने आमदारकीची संधी आजरेकरांना पहिल्यांदाच मिळाली. त्यानंतर आजअखेर आजऱ्याचा आमदार झाला नाही. १९८० व १९८५च्या दोन्ही निवडणुकीत चंदगडमधून पुन्हा व्ही. कें.नीच बाजी मारली. त्यानंतर त्यांनी भाचे नरसिंगराव पाटील यांना ‘चाल’ दिली. आजरेकरांनी मामा-भाचे दोघांनाही साथ दिली. याउलट ‘अजातशत्रू’ असूनदेखील घाळींना गडहिंग्लजमध्ये आमदारकीची हॅट्ट्रिक करता आली नाही. कॉँग्रेसमधील दुफळीचा फायदा उठवून जनता दलाच्या अॅड. श्रीपतराव शिंदेंनी सलग दोनदा आमदारकी भूषविली. दरम्यान, चंदगडमध्ये व्यक्तीकेंद्रित गटातटाचे राजकारण सुरू झाले. त्यामुळेच शिंदे यांनीच केवळ जुन्या गडहिंग्लज मतदारसंघात चढत्या मताधिक्क्याने हॅट्ट्रिक नोंदविली.
गडहिंग्लज, आजऱ्याची शकले पडून बनला ‘चंदगड’
By admin | Published: September 15, 2014 12:46 AM