गडहिंग्लज : गेल्या दोन दिवसांपासून गडहिंग्लज परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे गडहिंग्लज शहरानजीकच्या भडगाव पुलावर हिरण्यकेशीचे पाणी आले आहे. त्यामुळे सकाळपासूनच गडहिंग्लजचा चंदगडशी संपर्क तुटला आहे. गडहिंग्लज नदीवेस परिसरातील पाणी स्मशानशेडच्या पुढे आले असून नदीकाठच्या लोकांना प्रशसनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, गिजवणे, इंचनाळ, जरळी, निलजी, खणदाळ, नांगनूर व गोटुर हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, गडहिंग्लज-काळभैरी मार्गावरील लाखेनगरजवळील सुतारकीच्या ओढ्यावर पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
गडहिंग्लज शहरातील संकेश्वर रोडवरील तालुका संघाचा पेट्रोल पंपानजीक, बाजारपेठ, नेहरू, शिवाजी चौक, मेटाचा मार्गावरील गटारी तुंबल्याने परिसरातील घरात पाणी शिरले आहे.
चौकट :
येणेचवंडी तलाव भरला
येणेचवंडी येथील ५४ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव जोरदार पावसाने पूर्ण क्षमतेने भरला आहे. अतिरिक्त पाणी तलावातून बाहेर पडत आहे. २०१९ मध्ये हा तलाव दुरुस्त करण्यात आला आहे. घटप्रभा नदीवरील कडलगे-तावरेवाडी दरम्यानचा जुना बंधारा पाण्याखाली गेला असून पर्यायी नवीन पुलावरून नेसरी-कोवाड वाहतूक सुरू आहे.
नेसरी-चंदगड मार्गावर तळेवाडीनजीकच्या नागम्मा ओढ्यावर पाणी आल्यामुळे दुपारी काही काळ वाहतूक ठप्प होती.
नेसरी-कानेवाडी मार्गावर गूर ओहोळ ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
चौकट : चंदगड तालुक्यात घटप्रभा, ताम्रपर्णी पात्राबाहेर
चंदगड :
मुसळधार पावसामुळे चंदगड तालुक्यात घटप्रभा व ताम्रपर्णी नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. ताम्रपर्णी नदीकाठावर वसलेल्या कोवाडच्या बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
तालुक्यात मंगळवारी (२०) सकाळपर्यंत संपलेल्या २४ तासात एकूण ४५७ मिमी पाऊस झाला आहे. घटप्रभा, ताम्रपर्णी या नद्या पात्राबाहेर पडले आहेत. घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर, भोगोली, हिंडगाव, कानडी, सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी तर ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कोनेवाडी, हल्लारवाडी व कोवाड हे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तडशिनहाळमधील महादेव गणू कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे.
तालुक्यातील जंगमहट्टी प्रकल्पासह आंबेवाडी, दिंडलकोप, हेरे, जेलुगडे, कळसगादे, करंजगाव, किटवाड, निट्टूर, पाटणे, सुंडी, काजिर्णे या धरणाच्या पाणीपातळीत झाली आहे.
चौकट : साळगाव बंधारा पाण्याखाली
पेरणोली : साळगाव (ता. आजरा) येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी सोहाळे मार्गावरून सुरू आहे.
दरम्यान, गडहिंग्लज-उत्तूर मार्गावरील मुमेवाडी गावतलाव पहिल्यांदाच पूर्णक्षमतेने भरला आहे. अतिरिक्त पाणी रस्त्यावर आल्यामुळे गडहिंग्लज-उत्तूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे उत्तूरमार्गे कोल्हापूर व निपाणीकडे होणारी वाहतूकही बंद झाली आहे.
आंबेओहोळ प्रकल्पात ६४ टक्के तर चिकोत्रा प्रकल्पात ६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. तुरूक नाल्यावर पाणी आल्यामुळे चिमणे, चव्हाणवाडी, अरळगुंडी, वझरे, महागोंड, होन्याळी या गावांचा उत्तूरशी संपर्क तुटला आहे. उत्तूर येथील वसंत हणमंत हळवणकर यांच्या घराची भिंत पडून २० हजाराचे. प्रकाश हरी अस्वले यांच्या घराची भिंत पडून २५ हजाराचे तर दिगंबर बाबूराव देसाई यांच्या घराची भिंत पडून ७० हजारांचे नुकसान झाले आहे.
चौकट : आजरा तालुक्यातील १० बंधारे पाण्याखाली
आजरा :
आजरा तालुक्यात मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी व चित्री नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे साळगाव, दाभिल, देवर्डे, चांदेवाडी, हाजगोळी, भादवण, किटवडे, शेळप, आंबाडे, परोली हे १० बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मडिलगे, मुमेवाडी, धामणे, उचंगी, वाटंगी, येमेकोंड, शिरसंगी, भावेवाडी येथे ओढ्याचे पाणी शेतात घुसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. किटवडे परिसरात २९४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. चित्री धरणात ७८ टक्के, आंबेओहोळ धरणात ६२ टक्के तर खानापूर धरणात ७४ टक्के पाणीसाठा झाला. एरंडोळ धरणाच्या सांडव्यातून १०५ तर धनगरवाडी धरणाच्या सांडव्यातून १३० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वांजळेवाडीजवळ ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने आजरा-कोल्हापूर वाहतूक सकाळी ११ पासून तर जेऊरच्या ओढ्यावर पाणी आल्याने चंदगड मार्गावरील वाहतूक बंद आहे. आजऱ्याच्या रामतीर्थवरील राम मंदिरात सायंकाळी पाणी शिरले. रामतीर्थचा धबधबा व हिरण्यकेशीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
१) कडलगे (ता. चंदगड) येथील ओढ्यावर पाणी आल्याने कोवाडकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.
क्रमांक : २२०७२०२१-गड-०५ २) हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.
क्रमांक : २२०७२०२१-गड-०४ ३) परोली बंधाऱ्यावर आलेले चित्री नदीचे पाणी.
क्रमांक : २२०७२०२१-गड-०६