गडहिंग्लज : दरवर्षी देशी बेंदूरनिमित्त येथील शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे घेतली जाणारी सदृढ बैलजोडी स्पर्धा यावर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे होते.
स्पर्धेचे यंदा २२ वे वर्ष आहे. परंतु, कोरोनामुळे सलग दुस-या वर्षीदेखील ही स्पर्धा रद्द करावी लागली. गडहिंग्लज तालुका मर्यादित असणा-या या स्पर्धेतील बैलजोड्या पाहण्यासाठी सीमाभागातील हजारो शेतकरी दरवर्षी गडहिंग्लजला येतात.
बैठकीस नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भैसकर, प्रकाश तेलवेकर, काशिनाथ देवगोंडा, सदाशिव रिंगणे, भाऊसाहेब पाटील, शिवाजी ताशिलदार, महादेव पाटील, शिवाजी रेडेकर, मोहन भैसकर, रमेश पाटील, राणा चव्हाण, अजित चव्हाण, अमित पाटील, बाळासाहेब माने, मकरंद कुलकर्णी, चंद्रकांत मेवेकरी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
२) गडहिंग्लज येथे यावर्षीपासून प्रशासकीय सेवा महाविद्यालय सुरू
गडहिंग्लज : चालू शैक्षणिक वर्षापासून गडहिंग्लज येथे प्रशासकीय सेवा महाविद्यालय सुरू करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती तांबाळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती पाटील व उपाध्यक्ष माजी भाषा संचालक प. ग. पाटील यांनी दिली.
येथील टिळक रोडवरील कॅनरा बँकेजवळ हे महाविद्यालय सुरू होत आहे. स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
- ३) ओबीसी सेवा फाउंडेशनचा आगामी निवडणुकांना विरोध
गडहिंग्लज : स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसींचे आरक्षण अबाधित न ठेवल्यास आगामी निवडणुकांना विरोध करण्यात येईल, असा इशारा ओबीसी सेवा फाउंडेशनतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने दिलेले हे निवेदन येथील तहसीलदार दिनेश पारगे यांना शिष्टमंडळाने भेटून देण्यात आले. ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचा-यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात, श्री संत सेना नाभिक मंडळाचे अध्यक्ष शशिकांत यादव, संदीप झेंडे, रावसाहेब यादव, तानाजी सुतार, मारुती यादव, जयवंत सुतार, बाळासाहेब सुतार, गिरीश शिंदे, प्रदीप लोहार, संभाजी संकपाळ, चंद्रकांत शिंदे, प्रफुल्ल शिंदे आदींचा समावेश होता.