गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील सर्व विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला वारकरी आणि विठ्ठल भक्तांना धार्मिक विधी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या गडहिंग्लज शाखेतर्फे येथील प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, कार्याध्यक्ष तथा संपर्कप्रमुख नीतेश रायकर, तानाजी गुरव, गजानन काकडे व किरण पाटील यांचा समावेश होता.
--
२) ‘हसूरचंपू’ येथे रविवारी ‘लोकमत’चे रक्तदान शिबिर
गडहिंग्लज : हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील संतोष तेली युवा मंच आणि डॉ. घाळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रविवारी (दि. १८) सकाळी ९ ते ३ यावेळेत महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा व विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी गडहिंग्लज लायन्स ब्लड बँकेचे सहकार्य लाभले आहे.
-----
३) ‘ओंकार’मध्ये राष्ट्रीय चर्चासत्र
गडहिंग्लज : येथील ओंकार शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘वेब टू टूल्स व प्लॅगॅरिझम’ राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. चर्चासत्रात प्रा. पी. एस. कांबळे, प्रा. विशाल ओहाळ, प्रा. उपेंद्र सिंग यांनी मार्गदर्शन केले. संस्था उपाध्यक्ष ऋतुजा बांदिवडेकर, प्राचार्य सुरेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शर्मिला घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजीवनी पाटील यांनी आभार मानले.
-
४) ऐनापुरात ९० जणांची तपासणी
गडहिंग्लज : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे ९० जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात १९ जण कोविडबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गावातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४४ झाली आहे.