गडहिंग्लज :
अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याकडे ९ मार्चअखेर गाळपास आलेल्या उसाची एकूण एफआरपी ११ कोटी ८१ लाख ८५ हजार आणि तोडणी-वाहतुकीची बिले संबंधित शेतकरी व तोडणी वाहतूकदारांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत, अशी माहिती ‘ब्रिस्क’चे कंपनीचे सरव्यवस्थापक वसंत गुजर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, ८ वर्षे कंपनीने यशस्वीरीत्या चालविला. २०२०-२१ हंगामात ३ लाख ३९ हजार ४२१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. १२.१ टक्का साखर उताऱ्याने ४ लाख ६ हजार १९० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. १५ फेब्रुवारीअखेरच्या उसाची एफआरपी प्रतिटन २८०० प्रमाणे ८ कोटी ३२ लाख यापूर्वीच अदा केली आहे.
सेवानिवृत्त कामगारांची कंपनीकडून देय असलेली रक्कम १ कोटी ४९ लाख पैकी ५० टक्के म्हणजे ७४.५६ लाख २० फेब्रुवारीला २०२१ रोजी अदा केली आहे. उर्वरित ७४ लाख ५६ हजार ही रक्कम २६ एप्रिल २०२१ रोजी जमा करण्यात येत आहे.
उर्वरित कर्मचाऱ्यांची कायदेशीर देणी तपासणीचे काम सुरू असून ते अंतिम झाल्यानंतर देयके देण्याची तारीख कळविण्यात येईल, तसेच तोडणी वाहतूकदारांचे कमिशन व डिपॉझिट रक्कम दरवर्षीप्रमाणे नियत वेळेत दिले जाईल, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.