शहरातील बाजारपेठ, नेहरू चौक, लक्ष्मी मंदिर परिसर, लक्ष्मी रोड व गडहिंग्लज-संकेश्वर या मुख्य मार्गावर भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
नेहरू व शिवाजी चौक परिसरात दूध संस्था असल्याने सकाळी या परिसरात दूध नेण्यासाठी नागरिकांची वर्दळ सुरू आहे.
दरम्यान, ११ नंतर मात्र शहरात सर्वत्र सन्नाटाच पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवेअंतर्गत शहरातील बँकांनीही आपल्या कामाची वेळ कमी केली आहे. दुपारी २ नंतर, तर काही बँकांनी ३ नंतर कामबंद ठेवले आहे. त्यामुळे बँकेकडील व्यवहारासाठीही दुपारनंतर कोणी बाहेर पडत नाहीत.
सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशीही दिसत नाहीत. खासगी दुचाकी व चारचाकीतून बाहेर जाणाऱ्यांचीही संख्या कमी झाली आहे. नाक्यांवरील तपासणी आणि दंडात्मक कारवाईमुळे नागरिकांनी विनाकारण प्रवास करणे टाळले आहे.
शहरात विनामास्क, विनाकारण, फिरणाऱ्यांवरही प्रशासनाने दंडात्मक कारवाईच्या मोहिमेसह कोरोना चाचणीही मोहीम सुरू केल्याने नागरिकांनी घरीच राहणे पसंद केले आहे.