राम मगदूम। गडहिंग्लज :
कोरोना महामारीमुळे कर्नाटक-महाराष्ट्र दरम्यानची आंतरराज्य वाहतूक सध्या बंद आहे. परंतु, बस्तवडे पुलावर पाणी आल्यामुळे गोरंबे मार्गे आणि मुरगूडच्या तलावाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे मुरगूड मार्गे सुरू असणारी वाहतूक गुरुवारी (२२) बंद झाली. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यांचा कोल्हापूरशी संपर्क तुटला आहे. म्हणून आंतरराज्य वाहतुकीचे निर्बंध उठवून गडहिंग्लज-कोल्हापूर बसफेऱ्या निपाणी मार्गे पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे.
अलीकडे, निपाणी व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे नेहमी निपाणी मार्गे सुरू असणाऱ्या बसफेऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले. खासगी वाहतुकीची मुभा कायम ठेवण्यात आली आहे. परंतु, आंतरराज्य वाहतूक बंदीच्या नियमानुसार बसफेऱ्या बंद झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह रुग्ण व नातेवाइकांचे खूप हाल होत आहेत.
दरम्यान, गुरुवारी (२२) गडहिंग्लजहून कोल्हापूरला जाणारे २० ते २५ प्रवासी आज दिवसभर गडहिंग्लज बसस्थानकावर अडकून पडले होते. त्यामुळे कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वडरगे-बहिरेवाडी निपाणी बायपास मार्गे बस सोडून ‘त्या’ प्रवाशांना सायंकाळी कोल्हापूरला पोहोचविले.
चौकट :
अत्यवस्थ रुग्णांचा जीव धोक्यात
गडहिंग्लज विभागातील कोरोनाबाधितांसह अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला न्यावे लागते. परंतु, कोरोनामुळे निपाणी मार्गे आणि पूरपरिस्थितीमुळे पर्यायी गोरंबे मार्गे सुरू असलेली वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
चौकट : गिजवणे ग्रामपंचायत सदस्यांची मागणी..!
गडहिंग्लज-कोल्हापूर बसफेऱ्या पूर्ववत निपाणी मार्गे सुरू कराव्यात, अशी मागणी गिजवणे ग्रामपंचायत सदस्यांनी गडहिंग्लज आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली. शिष्टमंडळात उपसरपंच नितीन पाटील, सदस्य लक्ष्मण शिंदे, अमित देसाई, भूषण गायकवाड व अमित दळवी आदी उपस्थित होते.
क्रमांक : २२०७२०२१-गड-१०