कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गडहिंग्लज नगर परिषदेतर्फे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत पालिकेने ६४ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला.
२२ फेब्रुवारीपासून शहरात विनामास्क फिरणाऱ्या ६४४ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. त्यामधून इतका दंड गोळा झाला. मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ अखेर वर्षभरात ५ लाख १७ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
नगरपालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम राबवून केवळ दंड वसूल न करता नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या वेळोवेळी सूचना दिल्या आहेत.
दंड वसूल करणे हा प्रशासनाचा उद्देश नसून नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि साथ नियंत्रणासाठी ही मोहीम राबविली आहे. त्यामुळे शहरातील गर्दीच्या ठिकाणी सण-समारंभात, धार्मिक स्थळांवर आणि बाजारपेठ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर, सॅनिटायझर व मास्क लावून फिरण्यासह आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहनही मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केले आहे.