गडहिंग्लज : गेल्यावर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या २८४ दुकान गाळ्यांसह ६९ खुल्या जागेवरील खोकीधारकांचे एका महिन्याचे २ लाख ३४ हजार ५५० रुपये इतके भाडे माफ करण्याचा निर्णय गडहिंग्लज पालिकेने घेतला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांनी दिली.
कोरी म्हणाल्या, गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आला होता. त्या कालावधीत नगरपालिकेच्या दुकान गाळ्यांतील आणि खुल्या जागेतील खोकीधारकांचे सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे विविध पक्ष-संघटनांनी भाडेमाफीची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एका महिन्याच्या भाडेमाफीच्या ठरावास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार एप्रिल २०२१ या महिन्याचे भाडेमाफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही प्रा. कोरी यांनी सांगितले.