गडहिंग्लज :
कोरोना रुग्णांवरील खाजगी दवाखान्यातील उपचाराचा खर्च गरिबांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे लोकोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असणाऱ्या गडहिंग्लज नगरपालिकेने गोरगरिबांना आधार देण्यासाठी स्वत:चे कोविड काळजी केंद्र सुरू करावे, अशी शहरवासीयांची आग्रही मागणी आहे.
गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीनही तालुक्यांतील बाधितांचे प्रमाण गतवेळीपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केले आहे.
शेंद्री माळावरील शासकीय वसतिगृहात शासनातर्फे कोविड काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. याशिवाय शहरातील ५ खाजगी डॉक्टरांनीही कोविड दवाखाने सुरू केले आहेत.
परंतु, ऑक्सिजन बेडची कमतरता, रेमडेसिवरची टंचाई, व्हेंटिलेटरची वाणवा यामुळे गंभीर आणि अत्यवस्थ रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण यावेळी दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.
-----------------------------
* हे केले..! गतवर्षी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या गडहिंग्लज शहरासह गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीनही तालुक्यांतील १२३ कोविड रुग्णांवर गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे मोफत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावर्षीदेखील आजअखेर ८४ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
* कोरोनाचा शहरातील संसर्ग व फैलाव रोखण्यासाठी स्वत:ची आरोग्य यंत्रणा नसतानाही उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने नगरपालिकेने मोबाइल व्हॅनद्वारे अॅन्टिजन चाचण्यांची धडक मोहीम हाती घेतली आहे. आजअखेर ६५० चाचण्या झाल्या. त्यापैकी ६० बाधित आढळून आले.
-----------------------------
* हे करा..! कोरोनाबाधितांना राहत्या घरी अलगीकरणात ठेवणे पुरेशी जागेअभावी अनेकांना शक्य नाही. अशा रुग्णांच्या मोफत उपचारासाठी पालिकेतर्फे कोविड काळजी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.
-----------------------------
* दुसऱ्या लाटेतील ९ मेअखेरची आकडेवारी
- गडहिंग्लज शहरातील एकूण चाचण्या : २२६८ - एकूण बाधित रुग्णसंख्या : २८३ - बरे झालेले रुग्ण : १५९ - मृत्यू : ९
-----------------------------
* पहिल्या लाटेतील आकडेवारी अशी
- गडहिंग्लज शहरातील एकूण चाचण्या : ३१७० - एकूण बाधित रुग्णसंख्या : ५५२ - बरे झालेले रुग्ण : ५२३ - मृत्यू : २९ -----------------------------
फोटो : गडहिंग्लज नगरपालिका : ०९०५२०२१-गड-१२