गडहिंग्लज : चौदाव्या वित्त आयोग निधीच्या विनियोगातील समस्यांसह ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचा जागीच निपटारा करण्यासाठी संबंधित पंचायत समिती सदस्य, सर्व खातेप्रमुखांसह आपण तालुक्यातील सर्व गावांना भेटी देणार आहोत. १६ जुलैपासून हा उपक्रम सुरू होईल, अशी घोषणा सरपंच समितीचे अध्यक्ष तथा उपसभापती विद्याधर गुरबे यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केली.
सभापती विजयराव पाटील हे प्रकृती अस्वाथ्यामुळे सभेला अनुपस्थित होते. त्यामुळे उपसभापती गुरबे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सेवानिवृत्तीबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एस. देसाई, जलसंधारण अधिकारी एम. आर. पाटील, शाहू पुरस्कारप्राप्त कर्मचारी धनाजी राणे यांचा वृक्षाचे रोप देऊन सत्कार झाला.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी चौदाव्या वित्त आयोगातील निधीच्या विनियोगाचे सर्व सोपस्कार पूर्ण होणे आवश्यक आहे. दलित, दिव्यांग, महिला व बालकल्याणसह अन्य निधी वाटपाच्या तक्रारी येत आहेत. काही कामांचे फेरप्रस्ताव तयार करण्याची गरज आहे. त्याबाबत प्रशासनाने आढावा घ्यावा, असा आदेशही गुरबे यांनी दिला. त्यानुसार नियोजन करण्याची सूचना गटविकास अधिकारी डॉ. सीमा जगताप यांनी दिली.
रिक्तझालेल्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा तातडीने भरावी, अशी मागणी जयश्री तेली यांनी, तर भडगाव-हसूरवाडी रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी श्रीया कोणकेरी यांनी केली. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाचे काम संथगतीने सुरू आहे. जलयुक्त शिवार योजना निधीतून गावतलाव दुरुस्ती करून टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानादेखील संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्या अधिकाºयांवर कुणाचा दबाव आहे का? असा सवाल करून प्रस्तावाची पूर्तता न झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला कडगाव ग्रामस्थ टाळा ठोकतील, असा इशारा विठ्ठल पाटील यांनी दिला.‘लोकमत’चे अभिनंदन..!गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची यशस्वी कामगिरी, सोयी-सुविधा आणि कमतरता याविषयी अभ्यासपूर्ण वृत्तमालिका प्रसिद्ध करून सार्वजनिक आरोग्यसेवेला सकारात्मक पाठबळ दिल्याबद्दल सभेत खास ठरावाद्वारे ‘लोकमत’चे अभिनंदन करण्यात आले. माजी सभापती प्रा. जयश्री तेली यांनी हा ठराव मांडला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’च्या मालिकेमुळे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.