गडहिंग्लज : तीस हजारांच्या खंडणीसाठी सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्याचे अपहरण केल्याप्रकरणी गडहिंग्लज पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आदित्य दिलीपकुमार पाटील (वय २१, राजगुरूनगर, गडहिंग्लज), कार्तिक महादेव हेळवाडे (२०, कुन्नूर, ता. निपाणी), सौरभ शिवाजी येजरे (२१), स्वरूप संजय खेबुडे (२१, दोघेही रा. नंद्याळ, ता. कागल) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. अपहृत गौरव भगवान नाईकवडी (२१, सांडगेवाडी, ता. पलूस, जि. सांगली) याची पोलिसांनी सुटका केली.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गौरव हा कोल्हापुरातील भारती विद्यापीठात बी.फार्मसी.च्या अखेरच्या वर्षात शिकत असून, विद्यापीठाच्या जवळच असणाऱ्या वसतिगृहात राहतो. मंगळवारी (दि.१८) दुपारी तीनच्या सुमारास तो कॉलेजहून होस्टेलकडे जात असताना एका होस्टेलसमोर पांढऱ्या रंगाची चारचाकी उभी होती.चारचाकीतील एकाने गौरवला बोलवून घेतले, दुसऱ्याने त्याला जबरदस्तीने गाडीत बसविले. त्याचा मोबाईल काढून घेऊन त्याला निपाणीकडे आणले. त्याने त्याबाबत विचारले असता ‘तुझे तीन मित्र आमच्या ताब्यात आहेत, आमच्या बहिणीचा मॅटर असून, त्यामध्ये तूदेखील आहेस’ असे सांगितले.निपाणीजवळील डोंगराच्या परिसरातील एका कच्च्या रस्त्याला त्यांनी गाडी थांबविली. चेहऱ्याला स्कार्प बांधलेल्या मुलीबरोबर व्हिडीओ कॉल करून बोलले असता त्या तिघांच्यासोबत ‘तो’देखील होता, असे तिने सांगताच त्यांनी मोबाईल बंद केला. त्यानंतर त्यांनी गौरवला गाडीतून बाहेर काढले व आता काय करणार असे विचारले. त्यावेळी त्याने पोलिस ठाण्याला चला असे सांगितले. पोलिसांत गेलास तर दीड-दोन लाख जातील तू येथेच मिटवणार का ? असे त्यांनी विचारले.
‘बहिणीला ९० हजार खर्च आला आहे. पण, तू ५० हजार दे’ असे आदित्यने सांगितले. परंतु, ‘माझी परिस्थिती नाही, वडील आजारी आहेत’ असे गौरवने त्याला सांगितले. त्यामुळे ३० हजार दे नाहीतर मावशीच्या मुलीला घेऊन पोलिस ठाण्याला जाणार असे धमकावून त्याला मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या गौरवने मित्रांकडून पैशाची जोडणी करण्याचा प्रयत्न केला.त्यांनी त्याला पुन्हा गाडीत बसवून गडहिंग्लजमध्ये आणले. ती गाडी एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सोडली. मित्रांकडून पैसे मागून घे, ३० हजार देईपर्यंत सोडणार नाही असा दम दिला. दरम्यान, गौरवने गाडीच्या चालकासोबत येथील एका हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर एका कॉलनीकडे जाताना ‘तो’ पळून दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला आणि त्याने मित्रांना याबाबत माहिती दिली.दरम्यान, आदित्यने गौरवला दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने दुचाकीवरून उडी मारली. त्यावेळी आदित्यने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व ते पळून गेले. गौरवच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील अधिक तपास करीत आहेत.
सर्व्हिसिंग सेंटरमध्ये ‘नंबर’ पाहिलानिपाणीमध्ये हायवेनजीकच्या पेट्रोल पंपावर आदित्यने गौरवच्या गुगल पे वरून गाडीत ५०० रुपयांचे पेट्रोल भरले. गडहिंग्लजमध्ये गाडीचे सर्व्हिसिंग केल्यानंतर त्याचे २८० रुपयेही त्यालाच द्यायला लावले. त्यावेळी त्याने गाडीचा नंबर पाहिला होता.
पोलिसांना फोन, मित्रांनाही कळविलेतब्बल सहा तासांच्या अपहरणनाट्यात गडहिंग्लजमधील एका हॉटेलात पळून गेलेल्या गौरवने प्रसंगावधान राखून ११२ क्रमांकावरून पोलिसांना आणि आपल्या मित्रांनाही माहिती दिली. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याची सुटका केली.
आदित्य, कार्तिकला कोठडीगडहिंग्लज पोलिसांनी शिताफीने संशयित चौघांनाही तातडीने ताब्यात घेतले. त्यापैकी आदित्य व कार्तिक यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली असून, सौरभ व स्वरूप यांना उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. गुन्ह्यात वापरलेली चारचाकी, दुचाकी आणि त्यांच्या मोबाईलवर संभाषण केलेल्या ‘त्या’ युवतीचाही पोलिस शोध घेत आहेत.