नूल : खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथे कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी व गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून पं. स. उपसभापती ईराप्पा हसुरी यांच्याहस्ते औषध फवारणी मशीन ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी सरपंच गजानन घोडके, रवी यरकदावर, शशिकांत पाटील, शंकर यरकदावर, मल्लाप्पा मुदपाकी, लक्ष्मण नाईक, ग्रामसेविका भारती ढेंगे व कर्मचारी उपस्थित होते.
-- २) नूलमध्ये कोरोना रोखण्यासाठी दूध संस्थांचा पुढाकार
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गावातील दूध संस्थांनी दूध घालण्यासाठी येणाऱ्या व दूध नेण्यास येणाऱ्या नागरिकांची ऑक्सिजन व तापमान तपासणी सुरू केली आहे. यामध्ये संशयास्पद आढळणाऱ्यांची त्वरित माहिती ग्रामपंचायतीकडे देण्यात येत आहे.
सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे, पी. एम. चव्हाण, ग्रामविकास अधिकारी अमृतराव देसाई यांनी ही योजना राबविली आहे.
गावातील शिव-पार्वती, कामधेनू, महालक्ष्मी, श्रीकृष्ण दूध संस्थांनी दोन दिवसांपासून ही मोहीम सुरू केली आहे.
- ३) संकेश्वरमध्ये पोलिसांचे पथसंचलन
संकेश्वर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात ५० पोलिसांच्या तुकडीने पथसंचलन केले. पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले. यावेळी विनाकारण बाहेर पडणाऱ्या व विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
--
४) गोटुर बंधाऱ्यावरील बरगे काढले
संकेश्वर : महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या गोटुर बंधाऱ्याचे बरगे जेसीबीद्वारे काढण्यात आले. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवू नये, यासाठी बरगे लावून पाणी अडविण्यात आले होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चक्रीवादळामुळे सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने हिरण्यकेशीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून नदीकाठच्या शेतांना धोका निर्माण होऊ नये म्हणून बरगे काढण्यात आले.