गडहिंग्लज: गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडची आणि मुरगुड ग्रामीण रुग्णालयात ५० बेडची सुविधा करणे यासंदर्भातील निर्णयासाठी आज, मंगळवारी (२५) सकाळी ११ वाजता मुंबई येथे मंत्रालयात तातडीची बैठक होत आहे.त्यामुळे दोन्ही दवाखान्यांच्या दर्जा वाढीचा मार्ग मोकळा होणार आहे.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर आणि संबंधित सर्व खात्यांचे अपर सचीव, संचालक व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे.२००५ मध्ये तत्कालीन मंत्री बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नामुळे गडहिंग्लजला ७ एकर प्रशस्त जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू झाले.त्यामुळे गडहिंग्लज, चंदगड,आजरा, भुदरगड,कागलसह सीमाभागातील गोरगरीब जनतेची मोठी सोय झाली.
याठिकाणी दररोज सुमारे ३०० बाहरूग्णांवर उपचार तर महिन्याला सुमारे १५० प्रसुती होतात. तथापि, गडहिंग्लज उपविभागातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या मर्यादा आणि वाढती रुग्णसंख्या विचारात घेता याठिकाणी २०० खाटांची सुविधा करावी आणि सीपीआरमध्ये मिळणाऱ्या सर्व सोयी- सुविधा गडहिंग्लजमध्ये उपलब्ध कराव्यात यासाठी आमदार राजेश पाटील यांनीही वर्षभर पाठपुरावा सुरू ठेवला होता.दरम्यान,ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनीही गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० खाटांची सुविधा करण्याचे आश्वासन वेळोवेळी दिले होते.दोन दिवसांपूर्वीच झालेल्या कोरोना आढावा बैठकीत त्यांनी मुंबईत आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्याला मंजुरी मिळवून देण्याची ग्वाही दिली होती.त्यानुसार ही बैठक होत आहे.कोरोना काळात मोठा आधार ..!कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय हे कोवीड समर्पित रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे गोरगरिबांना मोठा आधार मिळाला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजन प्लांटही सुरू झाला आहे.त्याशिवाय सिटी स्कॅन मशिनसह आणखी एक ऑक्सिजन प्लांट व अद्ययावत सोयी - सुविधा उपलब्ध करण्याचे आश्र्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिली आहे.त्यामुळे या बैठकीकडे गडहिंग्लज विभागाचे लक्ष लागले आहे.मुरगुडमध्ये ५० खाटांची सोय !मुरगुड ग्रामीण रुग्णालयात सध्या ३० खाटांची सोय आहे. त्याठिकाणी ५० खाटांची सोय करून अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्याचे आश्र्वासन मुश्रीफ यांनी दिले आहे.त्यालाही बैठकीत मंजुरी मिळणार आहे.