शिवानंद पाटील।
गडहिंग्लज : तालुक्यातील दहा गावांनी पहिल्या लाटेत कोरोनाला वेशीवरच थोपविले. परंतु, दुसऱ्या लाटेत या गांवामध्येही रुग्ण आढळून येत आहेत. याला अपवाद आहे तो फक्त नरेवाडी गावचा. दुसऱ्या लाटेत सर्वत्र रुग्ण वाढत आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यांत केवळ एकच व्यक्ती बाधित आढळल्यामुळे कोरोनानेच नरेवाडीकरांची दहशत घेतली आहे, असे चित्र दिसत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत तालुक्यातील नरेवाडीसह कडाल, नंदनवाड, हेळेवाडी, नांगनूर, निलजी, बुगडीकट्टी, कडलगे, हुनगिनहाळ आणि बिद्रेवाडी या दहा गावांनी कोरोनाला गावात शिरकाव होऊ दिला नाही. औषधांची फवारणी, मास्क, कडक लॉकडाऊन आणि बाहेरून येणाऱ्यांना प्रवेशबंदी करून पहिल्या लाटेत कोरोनाचा संसर्ग टाळण्यात यश मिळविले. त्यावेळी ग्रामदक्षता समित्यांनी कंबर कसून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र या दहा गावांत रुग्ण सापडले. या वेळी त्यांना कोरोनाला परतावून लावण्यात यश मिळाले नाही, असे असतानाही यापैकी नरेवाडी गावाने पहिल्या लाटेत राबविलेली मोहीम पुन्हा कडक राबविली. त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांत रुग्ण आढळून येत असताना नरेवाडीत मात्र एकच व्यक्ती बाधित झाली आहे.
गावची लोकसंख्या केवळ ६८८ असून ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, दक्षता समिती व आरोग्य कर्मचारी यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून चोख अंमलबजावणी केल्यामुळेच कोरोनाला रोखण्यात नरेवाडीकरांनी यश मिळविले आहे.
---------------------
या गावांनी घ्यावा आदर्श
तालुक्यातील महागाव, भडगाव, करंबळी, अत्याळ, गिजवणे, कडगाव, मुगळी, नूल व नेसरी ही गावे हॉटस्पॉट बनली आहेत. महागावमध्ये २२६, भडगावमध्ये १२५, करंबळी, अत्याळ, गिजवणे, कडगावमध्ये ८० हून अधिक आणि मुगळी, नूल, नेसरीत ६० पेक्षा अधिक बाधित आढळून आले आहेत. बाधितांची संख्या वाढणार नाही, यासाठी नरेवाडीसारख्या लहान गावाने केलेल्या नियोजनाचा आदर्श घ्यायला हवा.