गडहिंग्लज : नवीन मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी भारत मुक्ती मोर्चाच्या गडहिंग्लज शाखेतर्फे करण्यात आली आहे. तहसीलदार दिनेश पारगे यांना हे निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात, तालुकाध्यक्ष एस. जी. उंडगे, किरण कांबळे, नितीन बारामती, उमेश कांबळे, सागर कांबळे यांचा समावेश होता.
-----------------------
२) स्वातंत्र्यसैनिक स्मारकासाठी नूल येथे जागेची मागणी
गडहिंग्लज : स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूल येथे स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने जागा द्यावी, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सरपंच प्रियांका यादव यांना हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, नूल येथील २८ स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे. त्यांचे स्मारक व्हावे, अशी त्यांच्या कुटुंबीयांची व ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. स्मारकासाठी ग्रामपंचायतीने ठराव करून दिला आहे. मात्र, अद्याप जागा ताब्यात मिळालेली नाही.
शिष्टमंडळात आप्पाजी काळे, सुनील नांगरे, अजितकुमार चव्हाण, प्रकाश तेलवेकर, अरविंद चव्हाण, श्रीरंग चौगुले, राजेंद्र आरबोळे आदींचा समावेश होता.
-------------------------- ३) कौलगे येथे योग दिन
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन साजरा झाला. अरुण येसरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. मुख्याध्यापिका इनामदार यांनी मार्गदर्शन केले. नामदेव यादव व स्वाती पाटील यांनी योगाची प्रात्यक्षिके घेतली.
--------------------------
४) कानडेवाडीकरांना दिलासा
गडहिंग्लज : कानडेवाडी येथील अॅन्टिजन चाचणी शिबिरात २७५ नागरिकांची तपासणी झाली. परंतु, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे कानडेवाडीकरांना दिलासा मिळाला आहे.
--------------------------
५) मुस्कान मणेर हिची निवड
गडहिंग्लज : भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मुस्कान मणेर हिची असेंचर इंडिया कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. तिला संस्थाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव प्रा. स्वाती कोरी, कॅम्पस डायरेक्टर डॉ. डी. एस. बाडकर यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य आय. टी. पटेल व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------------
६) अप्पी पाटील गटाचे महागाव ग्रामपंचायतीला निवेदन
गडहिंग्लज : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महागाव येथील गटारींची स्वच्छता करावी व नागरिकांना तातडीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी अप्पी पाटील गटातर्फे ग्रामपंचायतीकडे निवेदनातून करण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी शशीकांत कुंभार यांना हे निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात, श्रीशैल पाटील, उदय सोमशेट्टी, प्रशांत शिंदे, फिरोज सोलापुरे, निहाल मुगळे यांचा समावेश होता.