गडहिंग्लज : शहरातील डॉक्टर्स कॉलनीमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी सम-विषम पार्किंगचे नियोजन करावे, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली होती. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी याबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे येत्या चार दिवसांत या परिसरात सम-विषम पार्किंगचे नियोजन न केल्यास या परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
------------------------
२) 'न्यू होराईझन'मध्ये योगा दिन
गडहिंग्लज : शहरातील न्यू होराईझन स्कूलमध्ये जागतिक योग दिन पार पडला. शिक्षिका रोहिणी खंदारे, सुजाता माने, गीता किल्लेदार व माधवी चव्हाण यांनी योगाचे महत्त्व विषद करून योगाची विविध प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी मुख्याध्यापिका सुनीता पाटील, मुख्याध्यापिका डायस यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------
३) गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांचे लसीकरण
गडहिंग्लज : गारगोटी (ता. भुदरगड) येथील ग्रामीण रुग्णालयात १८ वर्षांवरील दिव्यांगांचे लसीकरण करण्यात आले. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लसीकरणाचे उद्घाटन झाले. यावेळी बी. डी. डवरी, पी. ओ. पवार, एस. बी. यत्नाळकर, अजित चौगुले, रणधीर शिंदे, संदेश भोपळे, राहुल देसाई, प्रकाश पाटील, विलास कांबळे, आदी उपस्थित होते. खास दिव्यांगांसाठी दर सोमवारी हे लसीकरण करण्यात येणार आहे.
-----------------------
४) 'साधना'ला पदविका अभ्यासक्रमाची मान्यता
गडहिंग्लज : येथील साधना महाविद्यालयाला चालू शैक्षणिक वर्षापासून विज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव प्रा. जे. बी. बारदेस्कर यांनी दिली. इंग्रजी माध्यमाच्या या महाविद्यालयात २०१८ पासून वाणिज्य विभागही सुरू करण्यात आला आहे.
-----------------------
५) गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचा संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार झाला. मंत्री मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्नामुळे महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न व वाणिज्य शाखेस मंजुरी हे दोनही प्रश्न मार्गी लागले आहेत. यावेळी प्र. प्राचार्य सुरेश चव्हाण, काशिनाथ तनंगे, अनिल सावरे, आदी उपस्थित होते.
-------------------------
६) 'ओंकार'कडून ५०० मास्कची निर्मिती
गडहिंग्लज : शहरातील ओंकार महाविद्यालयाच्या राष्ट्री येवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी कोरोना रोखण्यासाठी दत्तक खेड्यासाठी ५०० मास्कची निर्मिती केली. याकामी प्रतिभा दुंडगे, ज्योती मुगूडकर, श्रृती होडगे, मेघा सुतार, सरिता कुंभार, अमृता आळवणे, पूजा चौगुले, मनीषा राणे, भक्ती मुगुडकर, सुषमा चव्हाण, श्रीदेवी गायकवाड, सुस्मिता लांडे, आरती कसलकर, वालुश्री कुंभार, ऋतुजा पाटील यांनी परिश्रम घेतले.
-------------------------
७) गडहिंग्लजमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 'उत्तम आरोग्यासाठी योग' या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा झाली. कार्यशाळेत ६० जणांनी भाग घेतला. सुरेश धुरे यांनी 'योग साधनेतील त्रुटी व शास्त्रोक्त योग' याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य सुरेश चव्हाण, डॉ. अनिल पाटील, प्रा. डी. एस. क्षीरसागर, समीर कुलकर्णी, ऋतुजा बांदिडेकर, आदी उपस्थित होते.
-------------------------
८) 'घाळी'मध्ये नव्या अभ्यासक्रमांना मंजुरी
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात एम.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, बी.कॉम. (आय.टी.) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना, एम.कॉम. (अकौंटन्सी) या अतिरिक्त तुकडीस व इंग्रजी माध्यमाच्या वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्षास शासनाची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी दिली.