गडहिंग्लज : ‘ब्रिस्क’ कंपनीने कारखाना सोडू नये आणि सेवानिवृत्त कामगारांचा प्रश्न निकाली काढावा यासाठी अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी आणि विरोधी संचालकांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना आज (शुक्रवारी) साकडे घातले.
कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, विरोधी आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांच्यासह संचालकांनी कागलच्या शासकीय विश्रामगृहात मुश्रीफांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे उपस्थित नव्हते. ‘ब्रिस्क’ परत गेल्यास कारखाना बंद पडून शेतकरी, कामगार आणि कारखान्याचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे विस्तारीकरण व आधुनिकीकरणासह सेवानिवृत्त कामगारांच्या देणीसंदर्भातील प्रस्ताव कंपनीने दिल्यास त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेता येईल; परंतु ऐनवेळी कंपनीने कारखाना सोडू नये, अशी विनंती करण्यात आली. तथापि, केवळ साखरेच्या उत्पादनावर कारखाना चालविणे कठीण असून कराराबाहेरील खर्चामुळे कंपनी तोट्यात आहे. कंपनीची मानसिकता नसल्यामुळे कारखान्याने नवा पर्याय शोधावा, लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वप्रकारची मदत करू, अशी ग्वाही मुश्रीफांनी दिली.
दरम्यान, सेवानिवृत्त चार कामगारांच्या आमरण उपोषणाचा आज (शुक्रवारी) दुसरा दिवस होता. त्याला सर्व श्रमिक महासंघातर्फे कॉ. दत्तात्रय अत्याळकर यांनी पाठिंबा दिला.