गडहिंग्लज :
शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात गडहिंग्लज तालुका नेहमीच आघाडीवर राहिला आहे. कोविड-१९ च्या लसीकरणासाठीही आरोग्य विभागाने सर्व तयारी ठेवली; परंतु लसींअभावी गडहिंग्लजचे लसीकरणाचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले आहे.
लसीकरण मोहीम राबविण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासह २० ठिकाणी ग्रामीण लसीकरण केंद्रावर लसीकरणाचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. गडहिंग्लज शहरातदेखील बॅ. नाथ पै विद्यालय आणि एम. आर. हायस्कूल या दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहे.
उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व पातळीवर आरोग्य यंत्रणा आजही सज्ज आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे काही शिक्षकांनी एकत्रित येऊन लोकगितांमधून लसीकरण जनजागृतीची मोहीम हाती घेतली. त्यामुळे प्रारंभी ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला असलेला धिम्या प्रतिसादात वाढ झाली. त्यामुळेच या वयोगटातील नागरिकांचे ग्रामीण भागात ९१ टक्के तर शहरात ७८ टक्के लसीकरण झाले. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी पुरेशी लस उपलब्ध होत नाही, त्यामुळे सुरुवातीला केंद्रावर रांगा लावल्या. उपलब्ध लसींच्या प्रमाणापेक्षा अधिक नागरिक एकत्र येऊन गर्दी केल्याचे चित्र अनेक केंद्रावर पहायला मिळाले. शहरातील केंद्रावर कागल, भुदरगड तालुक्यातील काही नागरिकांनीही लस घेतली. याबाबत गडहिंग्लजमधील नागरिकांनी प्राधान्याने लस देण्याबाबतही नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली.
दुसरा डोस आणि १८ वर्षांवरील गटातील लसीकरणाचा पहिल्या दिवशी उडालेल्या गोंधळामुळे दुसऱ्या दिवशी लसींच्या प्रमाणात नियोजन करण्यात आले. केंद्रावर रांगा लागू नयेत, यासाठी लसींच्या प्रमाणात नोंदणीकृत व्यक्ती आल्यानंतरच लस देण्यात येते. उन्हात उभे रहावे लागू नये,
यासाठी केंद्रावर मंडप उभारण्यात आले आहेत.
----------------------
* तालुक्यातील लसीकरण असे :
- ग्रामीण भागात झालेले लसीकरण - ६७३६५ - शहरी भागात झालेले लसीकरण - १२००४ - ग्रामीण भाग दुसरा डोस घेतलेले -९४००
- ४५ वर्षांवरील एकही डोस न घेतलेल्या व्यक्ती (ग्रामीण) - ६५१३ - ४५ वर्षांवरील एकही डोस न घेतलेल्या व्यक्ती (शहरी) - ३३५५