राम मगदूमगडहिंग्लज : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिवंगत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या पश्चात गडहिंग्लज विभागातील कार्यकर्त्यांचा पहिलाच मेळावा आज, मंगळवारी होत आहे. त्यामुळे 'गडहिंग्लज'चा जनता दल देवेगौडांच्या की शिंदेंच्या वाटेने जाणार? याची उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आहे.गेल्या तीन दशकात महाराष्ट्रासह देशातील राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. एकेकाळी देशात आणि राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या जनता दलाचीही अनेक छकले झाली. परंतु, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी कर्नाटकात आणि महाराष्ट्रात केवळ शिंदेनी आपल्या तालुक्यात अस्तित्व टिकवले.'समाजवादी पक्ष ते जनता दल' वाटचालीत शिंदे अखेरपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. म्हणूनच कोल्हापूर जिल्हयासह राज्याच्या राजकारणात त्यांचे नाव चर्चेत राहिले. देशात- राज्यात पक्षाची कुठेही सत्ता नसतानाही त्यांनी गडहिंग्लज नगरपालिका व कारखान्यावरील वर्चस्व कायम राखले. त्यामुळे चंदगड व कागल मतदारसंघात त्यांची भूमिका निर्णायक राहिली.शिंदेंच्या कन्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनीही वडीलांचा विचार आणि वारसा पुढे चालवण्याचा इरादा शोकसभेतच स्पष्ट केला आहे. दरम्यान,कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाची धुरा त्यांच्याकडेच सोपवल्यामुळे त्यांच्या भूमिकेवरच येथील वाटचाल अवलंबून आहे.दरम्यान,माजी पंतप्रधान देवेगौडा,त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी घेतलेला भाजपप्रणित आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना रूचलेला नाही. त्यामुळे कांहीजण आमदार अबु आझमी यांच्या समाजवादी पक्षात गेले. परंतु, शिंदेंनी घडवलेल्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर अजूनही 'मोळीवाल्या बाई'चीच पताका आहे.
तर 'तिथे'च पोहचणार!गडहिंग्लज शहरात राष्ट्रवादी हाच जनता दलाचा पारंपरिक राजकीय शत्रू आहे. अलिकडेच तीन प्रमुख माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जावून मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले आहे. त्यामुळे 'तिथे' अजिबात जाणार नाही,असे स्वाती कोरींनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. परंतु,देवगौडांच्या वाटेने गेल्यास त्या तिथेच पोहचणार आहेत.
'इंडिया आघाडी'च पर्याय स्वाती कोरींच्याकडे नगरपालिका, कारखाना, कुक्कुटपालन, तंत्रनिकेतनमधील कामाचा अनुभव, संघटन कौशल्य, वक्तृत्व कला आहे.त्यामुळे येत्या विधानसभेला कागल व चंदगड दोन्ही मतदारसंघात त्यांना उमेदवारीची आहे.परंतु, त्यासाठी 'इंडिया आघाडी' हाच चांगला पर्याय असून लोकसभा निवडणुकीतच निर्णय घ्यावा लागणार आहे.
'शिंदें'चा विश्वास संघर्षावरच !लोकांचे प्रश्न सत्तेमुळे नव्हे तर संघर्षातूनच सुटतात,यावरच शिंदेंचा ठाम विश्वास होता.त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या अमिषाला बळी न पडता ते अखेरपर्यंत रस्त्यावरची लढाई लढत राहिले.धर्मांध व जातीयवादी शक्तींशी कधीच हातमिळवणी केली नाही.त्यांचा हाच विचार लोकांचे मनोबल वाढवणारा आणि पक्षाला उभारी देणारा आहे.त्याचे भान ठेवूनच निर्णय व्हावा, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.