कोल्हापूर : मला गदिमांच्या तोंडून रामायणातील काही गाणी ऐकायची होती. ती एकदा धाडस करून त्यांना हे सांगितले. त्यांनी त्याचवेळी एकापाठोपाठ सहा गाणी म्हटली आणि मी धन्य झाले, अशा शब्दांत सुनंदा देशपांडे यांनी ग. दि. माडगुळकर यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या आणि उपस्थित भारावून गेले.
ग. दि. माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी अक्षर दालन येथे त्यांच्या आठवणी जागवण्यात आल्या. सुरुवातीला पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समीर देशपांडे यांनी स्वागत केले. प्रताप पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अरुण सुनगार, प्रा. शशिकांत चौधरी यांनी गदिमांच्या कवितांचे वाचन केले.
मिलिंद यादव यांनी माडगुळकर यांचा शिवाजी पेठेवरील लेख वाचल्यानंतर अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गुरुनाथ हेर्लेकर यांनी त्यांच्या गीतांचे सादरीकरण केले. रवींद्र जोशी यांनीही औदुंबर परिसर आणि गदिमा यांच्यातील नाते उलगडून दाखवले.
माडगुळकर यांचे पुणे येथे लवकरात लवकर स्मारक उभारावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी एस. वाय. कोरवी, शिली खलीले, प्रमोद कुलकर्णी, डॉ. नंदुकमार जोशी, गुरुनाथ जोशी, प्रदीप चौकळे, नामदेव मोरे, माणिकराव इंदुलकर, संतोष अकोळकर, यश रूकडीकर यांनीही कवितांचे सादरीकरण केले.