कोल्हापूर : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी टेकडीजवळ उड्डाणपूल उभारावा, कागल मध्यवर्ती बसस्थानकानजीकच्या पुलाची रुंदी वाढवावी, अशी मागणी समरजित घाटगे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नवी दिल्ली येथे घाटगे यांनी गडकरींची भेट घेतली.
पुणे ते कागलपर्यंतच्या चौपदरीकरणाचे सध्या सहापदरीमध्ये विस्तारीकरणाचे काम प्रस्तावित आहे. यात कागलमधील उड्डाणपुलाच्या बाबतीत लक्ष घालावे, अशी विनंती घाटगे यांनी केली. याशिवाय बेळगाव सावंतवाडी या प्रस्तावित रेल्वेमार्गासह बेळगाव वेंगुर्ले या महामार्गाच्या रुंदीकरणाचे कामही विचाराधीन व्हावे, अशीही मागणी केली.
कागल पंचतारांकित, गोकूळ शिरगाव या औद्याेगिक वसाहत, साखर कारखाने, अनेक छोटे- मोठे प्रकल्प यामुळे लक्ष्मी टेकडी परिसरात वाहतुकीची मोठी वर्दळ असते. अनेक वेळा येथे अपघातही घडले आहेत. येथे उड्डाणपूल झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, त्यामुळे सहापदरीचे काम हातात घेताना ही कामे प्राधान्याने करावीत, अशी विनंतीही घाटगे यांनी गडकरी यांच्याकडे केली.
फोटो: २३०३२०२१-कोल-घाटगे
फाेटो: भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गाबाबतीत सुधारणा सुचवल्या.