कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. गगनबावडा, चंदगड व आजऱ्यात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक पाऊस ९६.४ मिली मीटर गगनबावडा तालुक्यात झाला आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.मंगळवारी सायकाळ पासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीसा जोर धरला. रात्रभर पावसाची रिपरिप राहिली. मात्र बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. सकाळी तर गगनबावडा, चंदगड, आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात धुवांदार पाऊस झाला. कोल्हापूर शहरातही सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत पावसाचा जोर राहिला. त्यानंतर काही काळ पावसाने उघडीप दिली.
दुपारनंतर पुन्हा जोरदार सरी कोसळण्यास सुुरुवात झाली. जिल्ह्यातही दिवसभर जोरदार पाऊस सुरू राहिल्याने नदी, ओढ्याना पाणी वाढले आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून बुधवारी पंचगंगेची पातळी १५ फुटापर्यंत पोहचली होती.
तालुकानिहाय झालेला पाऊस मिली मीटरमध्ये असा-हातकणंगले (२०.४), शिरोळ (२५), पन्हाळा (२४.२), शाहूवाडी (१६.६), राधानगरी (४१.४), गगनबावडा (९६.४), करवीर (२८.४), कागल (४७.५), गडहिंग्लज (६०.५), भुदरगड (४४.८), आजरा (७३), चंदगड (६८).