कोल्हापूर: शाहूवाडीतील गायकवाड गटाची ताकद हातकणंगलेतील काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या मागे राहील, अशी ग्वाही काँग्रेसच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांनी दिली. या आठवड्यातच शाहूवाडीमध्ये संयुक्त मेळावा घेउन कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रीय होण्याच्या सुचना दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी दुपारी खासदार राजू शेट्टी व जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्यात शाहूवाडीतील पाठींब्याच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. याला स्वत: संजीवनीदेवी यांच्यासह कर्णसिह व योगीराज गायकवाड यांच्यासह शाहूवाडीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार शेट्टी यांनी शाहूवाडी तालुक्यात खासदार फंडातून केलेल्या विकासकामांचा आढावा घेउन येणाऱ्या निवडणूकीत पाठीशी राहा असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनीही मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करत परिवर्तनाची गरज व्यक्त केली. सर्व मतभेद विसरुन महाआघाडीचे उमेदवार म्हणून शेट्टी यांना मदत करा असे आवाहनही आवाडे यांनी केले. महादेवराव पाटील, सुभाष इनामदार, पंडीत नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मानसिंग गायकवाड गटाची भूमिका सोमवारी ठरणारशाहूवाडीतील गायकवाड गटातील एक असलेले संग्रामसिंह गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. संग्रामसिंहांच्या रुपाने गायकवाड गटात कांहीशी विभागणी झाली असलीतरी कर्णसिंह गायकवाड यांच्याबरोबरच आता मानसिंग गायकवाड देखील आपली ताकद खासदार शेट्टी यांच्याच मागे उभे करणार असल्याचे सध्याचे तालुक्यातील चित्र आहे. येत्या सोमवारी (८) मेळावा घेउन पाठींब्याची अधिकृत घोषणा होणार आहे. दरम्यान याच दिवशी जनसुराज्यही भूमिका जाहीर करणार आहे. कार्यकर्त्यातून शिवसेनेला होणाऱ्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर विनय कोरेही महाआघाडीसोबत सकारात्मक असल्याच्या चर्चा आहेत. कार्यकर्त्यांमार्फत तसे संदेशही पाठवले जात आहेत.