लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चांदोली अभयारण्य व वारणा धरणग्रस्तांना देण्यात येणाऱ्या २१५ हेक्टर जमिनीची मोजणी करून तसे पत्र आंदोलकांना देण्यात यावे, जाखले (ता. पन्हाळा) येथील जमिनीचे सपाटीकरण करून द्यावे, गायरान व मुलकीपड जमिनींच्या प्रश्नाचे तातडीने निर्गतीकरण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अप्पर जिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकारी यांना सोमवारी दिल्या.
चांदोली व वारणा प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून श्रमिक मुक्तिदलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. याअंतर्गत दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी जिल्हाधिकारी देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी त्यांनी वारणा लाभ क्षेत्रातील लपून राहिलेल्या जमिनीचे शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर करावे, त्यांचे निवाडे आंदोलनकर्त्यांना देण्यात यावे. वारणा धरणग्रस्तांसाठी उपलब्ध जमिनींचे पसंती अर्ज भरून दिलेल्या नागरिकांचे आदेश दहा दिवसात देऊन त्यांना जमिनी ताब्यात द्याव्यात, तसेच निवळे वसाहत गलगले यांची उच्च न्यायालयात कॅवेट दाखल करून त्याचा पाठपुरावा करावा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी संपत देसाई, डी. के. बोडके, वसंत पाटील, टी. एल. पाटील, श्यामराव पाटील, पांडूरंग कोठारी, पांडूरंग पोवार उपस्थित होते.
--
चार दिवसांनी निर्णय
जिल्हाधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत सकारात्मक असले तरी ज्या विभागांकडे ही जबाबदारी आहे तेथून प्रश्नांची सोडवणूक होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची किती गांभीर्याने अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाते हे पाहून चार दिवसांनी आंदोलन सुरू ठेवायचे की स्थगित करायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे जिल्हाप्रमुख मारुती पाटील यांनी सांगितले.
---
फोटो नं ०८०३२०२१-कोल-श्रमिक मुक्ती दल
ओळ : कोल्हापुरातील श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनादरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आंदोलकांसोबत त्यांच्या मागण्यांसंबंधी चर्चा केली, यावेळी आंदोलकांनी त्यांना निवेदन दिले.
--