कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या ‘समर्थ पॅनेल’ने १२ जागा मिळवत बहुमत मिळवले. विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांनी सुशांत शेलार यांच्यावर १८ मतांनी विजय मिळविला. बुधवारी मध्यरात्री या मतमोजणीदरम्यान प्रचंड गोंधळ आणि धक्काबुक्की झाल्याने पोलिसांना मतदान केंद्रावर पाचारण करावे लागले. या निवडणुकीत समर्थ पॅनेलचे मेघराज राजेभोसले (निर्माता), मधुकर देशपांडे (प्रदर्शन-वितरण-स्टुडिओ -लॅब), सतीश रणदिवे (दिग्दर्शक), निकीता मोघे (संगीत, नृत्य पार्श्वगायन), पितांबर काळे (लेखक), सतीश बिडकर (क्रियाशील पॅनेल, कला-प्रसिद्धी), धनाजी यमकर (स्थिर-चलत छायाचित्रण), विजय पांडुरंग खोचीकर (संकलन), चैताली डोंगरे (रंगभूषा), शरद चव्हाण (ध्वनिरेखक), वर्षा उसगांवकर (अभिनेत्री), संजय ठुबे (निर्मिती व्यवस्था), रणजित जाधव (कामगार) या विभागांचे निकाल बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता जाहीर झाले. या निकालानंतर अभिनेता विभागाची मतमोजणी सुरू झाली. त्यामध्ये प्रथम २ मतपत्रिकांचा ताळमेळ बसेना म्हणून समर्थ पॅनेलच्या मतदान प्रतिनिधी व स्वत: उमेदवार सुशांत शेलार यांनी हरकत घेतली. या हरकतीवर निवडणूक समितीने पुन्हा मतपत्रिका तपासल्या, त्यामध्ये दोन मतपत्रिकांचा ताळमेळ लागला.संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर अभिनेता गटात विजय पाटकरांना ५८४, तर नजीकचे समर्थ पॅनेलचे सुशांत शेलार यांना ५६६ मते पडली. त्यामुळे पाटकर १८ मतांनी विजयी झाले. त्यावर शेलार यांनी हरकत घेत फेरमतमोजणी घ्यावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. के. व्ही. पाटील, पद्माकर कापसे, आकाराम पाटील, प्रशांत पाटील, पी. जी. पाटील यांच्याकडे केली. निवडणूक समितीने ही प्रक्रिया आहे. त्यामुळे वेळ लागणार, असे सांगितले. त्यावर समाधान न झाल्याने वादावादी झाली. त्याचदरम्यान पाटकर विजयी झाल्यानंतर ते मतमोजणी केंद्रात दाखल झाले.यावेळी त्यांना आपल्या विजयावर शेलार यांनी हरकत घेतल्याचे समजताच तेही १२ जण निवडून आले आहेत. त्यांचीही फेरमतमोजणी करा, मी याकरीता पैसे भरण्यास तयार आहे, असे सांगितल्याने हा वाद वाढतच गेला. त्यातून पाटकर यांनी समर्थ पॅनेलच्या कार्यकर्त्यांना ‘तुम्ही मुंबईत या मग सांगतो,’ असे म्हणताच कार्यकर्त्यांनी पाटकर यांच्यावर धाव घेतली. त्यातून वाद वाढतच गेला आणि प्रचंड गोंधळास सुरुवात झाली. त्यातून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. खुर्च्यांची फेकाफेकीही प्रचंड झाली. त्यातून कार्यकर्त्यांनी तोंडाला गुलाल लावल्याने कोण-कोणाला धक्काबुक्की करत होते, हे समजत नव्हते. त्यामुळे अखेरीस पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांना पाचारण करण्यात आले. बंदोबस्तातच पाटकर यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. अखेरीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समर्थ पॅनेलच्या मेघराज राजेभोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढल्याने हा वाद शमला आणि पाटकर विजयी झाल्याचे घोषित झाले. मंगळवारी (दि. २६) च्या सकाळी ८ वाजता सुरू झालेली ही मतमोजणी बुधवारी पहाटे ४-१५ ला संपली. (प्रतिनिधीमहामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले निश्चितकोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ पॅनेलचे प्रवर्तक व महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षपदावर बुधवारी १२ संचालकांच्या झालेल्या अनौपचारिक बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला. अध्यक्षपदाची निवड दि. ५ मे रोजी होणार आहे. मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनेलची घोषणा झाल्यानंतर स्वत: राजेभोसले यांनी महामंडळाच्या ३९०७ सभासदांपर्यंत प्रत्यक्षात भेटून आपल्या पॅनेलची ध्येय-धोरणे सांगितली. त्यांच्या या कामामुळे १४ संचालकांपैकी १२ संचालक महामंडळाच्या निवडणुकीत निवडून आले. याबद्दल बुधवारी सायंकाळी पाच वाजता राजेभोसले यांच्यासह १२ संचालकांनी महामंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी महामंडळाच्या फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महामंडळाच्या सभागृहात संचालकांची अनौपचारिक बैठक झाली. त्यात अध्यक्षपदासाठी मेघराज राजेभोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षपदासाठी महामंडळाची पहिली बैठक दि. ५ मे रोजी होणार आहे. त्या दिवशी अधिकृतरित्या निवडीची घोषणा होणार आहे. चित्रपट महामंडळाचा कारभार यापुढे पारदर्शक व सभासदांना केंद्रबिंदू मानून करणार आहे. मागील संचालकांनी केलेले घोटाळ्यांचा अभ्यासही या दरम्यान करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल. चित्रपट महामंडळाचा यापुढचा कारभार ‘पेपरलेस’असणार आहे. सभासदांच्या हितासाठी यापुढेही कार्यरत राहू. महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी माझीच निवड माझ्या सहकाऱ्यांनी केली असून ही निवड आता ५ मे रोजीच्या पहिल्या बैठकीत होईल. त्यातून पुढील कार्यकारिणीही निवडण्यात येईल. - मेघराज राजेभोसले, प्रवर्तक, समर्थ पॅनेलपोलिस आल्याने अनर्थ टळलामतमोजणी केंद्रात गोंधळ झाल्यानंतर समर्थ पॅनेलच्या कार्यकर्त्यांना आवरणे मेघराज राजेभोसले व अन्य ज्येष्ठांना कठीण होऊन गेले. त्यात काही कार्यकर्त्यांचा आवेश आणि संताप इतका होता, की त्यातून पाटकर यांना जबर मारहाण झाली असती. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यामुळे पाटकर स्वत: सह गाडी घेऊन तेथून गेले. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी पाटकर व त्यांच्या समर्थकांची गाडी फोडण्यासाठी मोठी शोधाशोध केली; पण गाडी त्यांना सापडली नाही. खुर्च्यांची फेकाफेक आणि जोरदार ओरडाओरडीमुळे गडकरी हॉल परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. हा तणाव सकाळी सव्वा चार वाजता निवळला.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सन २०१६-२०२० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवडण्यात येणाऱ्या संचालक मंडळासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीकरीता पाच सदस्यीय निवडणूक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून अॅड. के. व्ही. पाटील यांनी काम पाहिले तर सदस्यपदी पद्माकर कापसे, अॅड. पी. जी.अतिग्रे, अॅड. प्रशांत पाटील, आकाराम पाटील यांची नियुक्ती विद्यमान संचालक मंडळाने केली होती. ५० दिवसांहून अधिक काळ झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत पक्की मतदार यादी ते निवडीपर्यंतचे नि:पक्षपातीपणे काम या निवडणूक समितीने केले. १२० उमेदवारांनी ही निवडणूक लढल्याने जम्बो मतपत्रिका होणार अशी चिन्हे असताना या समितीने यावर १४ पानांची छोटी मतपत्रिका काढून ही निवडणूक पार पाडली.
निकालाच्या शेवटी गालबोट:मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक
By admin | Published: April 28, 2016 12:46 AM