कोल्हापूर : वर्दळीच्या महाद्वार रोडवरील जोतिबा रोड कॉर्नरवरील दुमजली जुन्या इमारतीची गॅलरी सोमवारी सकाळी कोसळली. अचानक मोठा आवाज होऊन धुळीचे लोट परिसरात पसरले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेले गॅलरीचे साहित्य बाजूला केले. या ठिकाणी धोकादायक इमारतीचा फलक असल्याने त्याच्या आजूबाजूला कोणी उभे राहत नव्हते; त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अधिक माहिती अशी, महाद्वार रोडवरील जोतिबा रोड कॉर्नरजवळच रुपशी शहा यांची दुमजली जुनी इमारत आहे. शहा यांनी मूळ मालकाकडून २०११ मध्ये खरेदी केली आहे. या इमारतीची आयुष्यमर्यादा संपली असल्याने ती धोकादायक असल्याची नोटीस महापालिका प्रशासनाने सातवेळा दिली आहे; परंतु या इमारतीमध्ये जगन्नाथ पाटील हे कुळ म्हणून राहत आहे. त्यांच्यात आणि शहा यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू आहे; त्यामुळे न्यायालयाने ही इमारत उतरण्यासाठी स्थगिती दिली आहे.
महापालिकेचे शहर उपअभियंता एस. के. माने यांनी न्यायालयासह जुना राजवाडा पोलिसांना पत्रव्यवहार करून इमारतीचे फोटो सादर केले आहेत. ही इमारत धोकादायक असल्याची पूर्वसूचना माने यांनी दिली आहे. इमारतीच्या आजूबाजूला किंवा खाली कोणी उभे राहू नये, अशा सूचनेचा फलकही लावला आहे. इमारतीमध्ये जगन्नाथ पाटील हे राहत आहेत. तर शहा यांचे खाली औषध दुकान आहे. त्यांनाही या ठिकाणी वास्तव्य करू नये, जीवितास धोका असल्याची सूचना लेखी दिली आहे; परंतु न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने पाटील आणि शहा यांनी त्याकडे दूर्लक्ष केले आहे. सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस शहरात झाला. त्यामुळे सकाळी अकराच्या सुमारास या इमारतीची दुसऱ्या मजल्यावरील दर्शनी गॅलरी रस्त्यावर कोसळून मोठा आवाज झाला.
धुळीचे लोट रस्त्यावर पसरले. महाद्वार रोडवर नेहमी नागरिकांची वर्दळ असते. नागरिक बाजूला गेल्याने जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाचे जवान संग्राम मोरे, नामदेव पाटील, योगेश जाधव यांनी धाव घेत रस्त्यावरील साहित्य बाजूला केले.