कोल्हापूर : तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक खेळ लुप्त होत चालले आहेत. या खेळांची भावी पिढीला ओळख व्हावी आणि त्यांचे महत्त्व पालकांना समजावे या उद्देशाने ‘चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ’ अंतर्गत आज, मंगळवारी तपोवन मैदान येथे पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास मुलांसह पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.आधुनिकतेमुळे पारंपरिक खेळ बंद पडले आणि नवीन खेळ आले. जुने खेळ फक्त आता गोष्टींत किंवा लिहिण्यापुरते उरले आहेत. हेच पारंपरिक खेळ टिकून रहावेत व त्याबाबत येणाऱ्या भावी पिढीला माहिती व्हावी, या उद्देशाने कोल्हापुरातील तपोवन मैदानावर तीन दिवस आठवणीतील खेळांची शाळा भरविली आहे. मुलांना पारंपरिक खेळांची माहिती देऊन तपोवन मैदानावर मनसोक्त खेळण्यास सोडले. मुलांनी व पालकांनी या खेळांचा मनमुराद आनंद घेतला. यातील अनेक खेळांची नावे मुलांना माहीतसुद्धा नव्हती; पण हा खेळ काय आहे, हे समजल्यानंतर मात्र मुले भारावून गेली आणि स्वत: हा खेळ खेळल्यानंतर मात्र त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या खेळांचे नियोजन मिलिंद यादव, सागर वासुदेवन, सचिन जिल्हेदार, सारिका बकरे, परशुराम पुजारी, कलंदर शेख यांनी केले. (प्रतिनिधी)हे खेळ खेळले जात आहेतगोट्या, कानढोपरी, सूरपारंब्या, टायर पळविणे, रस्सीखेच, रुमाल पळविणे, डबा एक्स्प्रेस, विटी-दांडू, भोवरा, जिबली, बिट्ट्या, गजगे, आबाधोबी मिळावा हे खेळ या ठिकाणी खेळले जात आहेत.आजही भरणार शाळा...पारंपरिक खेळांची शाळा उद्या, बुधवारी व गुरुवारी (दि. ३०) सकाळी ९ ते १२ या वेळेत तपोवन मैदानावर भरविण्यात येणार आहे. हे खेळ सर्वांसाठी मोफत असून, मुलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळी’तर्फे करण्यात आले आहे. पालकांना मोह आवरला नाही...लहानपणी आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत खेळलेला खेळ काळाच्या ओघात विसरत गेला. मात्र, या खेळाला पुन्हा उजाळा मिळाल्याने मुले खेळत असताना पालकांनाही खेळ खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे मुलांसोबत त्यांनीही खेळाचा आनंद घेतला.
आठवणीतील खेळांत रमला बालचमू
By admin | Published: October 29, 2014 12:02 AM