कोल्हापूर : केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून देशभरात सर्व व्यवहारांसोबत क्रीडा विभागही खुला करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, राज्य शासनाने याबाबतचे धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे घरात बसून वैतागलेल्या सर्व प्रकारच्या खेळाडूंनी मैदानासह जलतरण तलाव खुले करावेत. या मागणीसाठी सोेमवारी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व प्रकारच्या खेळाचा सराव करून अनोखे आंदोलन केले.कोरोनाच्या वाढता कहरामुळे राज्यातील मैदाने, स्पर्धा बंद असल्यामुळे खेळाडूंना सराव करता येईना झाला आहे. त्यामुळे खेळाडूंचे मानसिक, शारीरिक व वैयक्तिक गुणवत्तेचे मोठे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने सर्व व्यवहारांसोबत क्रीडा विभागही उघडण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. मात्र, राज्य शासनाने याबाबत कोणत्याही प्रकारचे धोरण जाहीर केलेले नाही.
याच्या निषेधार्थ सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. यामध्ये जलतरण, क्रिकेट, फुटबॉल, नेमबाजी, हॉकी, आदी खेळांतील खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या खेळाचा चक्क सराव केला. याबाबत समितीतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अशोक पोवार, कादर मलबारी, रमेश मोरे, राजेश वरक, बाबासाहेब देवकर, विनोद डुणुंग, विक्रांत पाटील, भाऊ घोडके, लहू शिंंदे, अमर सुतार, निळकंठ आखाडे, शिवाजी कामते, राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप, योगेश देशपांडे, प्रणव चौगले, रितेश चव्हाण, भक्ती पाटील, अहिल्या चव्हाण, प्रथमेश मोरे, आदींनी सहभाग घेतला.लक्षवेधी फलकदार उघड बाबा दार उघड, खेळाचे मैदान सुरू कर !, खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण करू नका, व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, क्रीडा विभाग बंद करून खेळाडूंना अपंग करू नका, जलतरण तलाव, व्यायामशाळा, तालमी, क्रीडांगणे सुरू करा, असे एक ना अनेक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.