कोल्हापूर : गेली दोन वर्षे जिल्हा पोलीस प्रशासन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील व पर्यावरणप्रेमी हे गणेशोत्सव हा पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
या प्रयत्नांसह कायद्याचा बडगा दाखविण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक मंडळांनी गुरुवारी ढोल-ताशा, झांजपथक, बेंजो, ब्रास बँड अशा पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. ‘मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया...’चा जयजयकार करीत शहरातील अनेक मंडळांनी रात्री उशिरापर्यंत गणरायाचे स्वागत केले. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील पोलीस ठाणे क्षेत्राअंतर्गत मंडळाच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन खुद्द पोलीस अधीक्षकडॉ. अभिनव देशमुख व त्यांची अधिकारी मंडळी करीत आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात अनेक मंडळांनी आपल्या गणेशमूर्ती साऊंड सिस्टीमऐवजी ढोल-ताशा, झांजपथक, बेंजो, बँड, आदी वाद्यांच्या गजरात नेल्या; तर काही मंडळांच्या गणेशमूर्ती लवकर तयार न झाल्याने रात्री उशिरापर्यंत ‘श्रीं’चे आगमन सुरू होते.
मंगळवार पेठ, शिवाजी पेठ परिसरातील तरुण मंडळांनी गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी मार्गावरून मिरवणूक काढली. बिंदू चौक, शिवाजी रोड, शिवाजी चौक, उमा टॉकीज, राजाराम रोड, स्टेशन रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, सुभाष रोड, आदी मार्गांवरून मंडळांची अधिक वर्दळ होती. गुरुवारी दिवसभरात जय शिवराय मित्र मंडळ, सुभाष रोड मित्र मंडळ, बालावधूत मित्र मंडळ, अमर तरुण मंडळ, राधाकृष्ण तरुण मंडळ ट्रस्ट, शिवाजी तरुण मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ (गोकुळ शिरगाव), कट्टा गु्रप, सुखकर्ता तरुण मंडळ, भैरवनाथ गल्ली मित्र मंडळ (पाचगाव), कात्यायनी मित्र मंडळ, शाहू पार्क तरुण मंडळ, जयहिंद तरुण मंडळ, शाहू दत्त मित्र मंडळ, फिनिक्स मित्र मंडळ, गोकुळ मित्र मंडळ, श्री तरुण मंडळ, शिवप्रेमी, इन्सॅट तरुण मंडळ, बागल चौक मित्र मंडळ, तिरंगा मित्र मंडळ, विश्वशांती तरुण मंडळ, प्रिन्स क्लब, महालक्ष्मी मित्र मंडळ, प्रॅक्टिस क्लब, त्रिमूर्ती मित्र मंडळ, एसटीसीएम तरुण मंडळ, क्रांती तरुण मंडळ, न्यू संभाजीनगर तरुण मंडळ, नृसिंह तरुण मंडळ, आदी मंडळांचा समावेश होता. ही आगमनाची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.वाद्यांना पसंतीयंदा साऊंड सिस्टीमपेक्षा पारंपरिक वाद्यांना मंडळांनी अधिक पसंती दिल्याने शहरासह जिल्ह्यातून आलेल्या ढोल-ताशा पथकांची चांगलीच कमाई झाली. विशेष म्हणजे ११०० रुपयांपासून ११ हजारांपर्यंत एका मिरवणुकीचा दर या ढोल-ताशा पथकांना मिळाला. त्यात बेंजोपथक, बँडपथक यांनाही चांगले काम मिळाले. त्यामुळे शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी, बापट कॅम्प, महाद्वार रोड, कसबा बावडा, आदी परिसरांत ढोल-ताशासह झांजपथकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसत होते.आकर्षक फुलांनी सजविलेली ट्रॅक्टर-ट्रॉली, वाहने घेऊन विघ्नहर्त्याला आणण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दुपारी तीननंतर बाहेर पडले.पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, उचगाव या ठिकाणी मंडळांनी गर्दी केली होती.त्यांनी ढोल-ताशा पथक, छोट्या साउंड सिस्टीम, झांजपथक , लेझीम पथक, बेंजो पथक आपल्यासोबत घेतले होते.आपली मूर्ती ट्रॉलीवर घेतल्यानंतर गणरायाचा गजर आणि ढोल-ताशांच्या कडकडाटावर कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यात मंडळाचे कार्यकर्ते कपाळावर ‘गणपती बाप्पा मोरया...’च्या भगव्या रंगाच्या पट्ट्या व टोप्या घालून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.